पुणे : तक्रारदाराच्या शेतात कुक्कुटपालनासाठी विद्युत कनेक्शन देण्याचे प्रकरण प्रलंबित आहे. त्याचे कोटेशन बनवून देण्यासाठी तक्रारदाराकडून १० हजार रूपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पिंपळगाव शाखा (ता.दौंड) येथील वीज वितरण विभागातील कनिष्ठ अभियंत्यावर यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
राहुल श्रीरंग लकडे (वय ३२, कनिष्ठ अभियंता वर्ग ३, म. रा. वि. वि. कंपनी, पिंपळगाव शाखा, ता. दौंड) असे गुन्हा नोंदविलेल्याचे नाव आहे. तक्रारदाराने शेतातील कुक्कुटपालनासाठी प्रलंबित विद्युत कनेक्शन देण्याच्या प्रकरणात त्याचे कोटेशन बनवून देण्यासाठी कनिष्ठ अभियंत्याने दहा हजार रूपयांची लाच मागितली असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्याची पडताळणी केल्यानंतर सोमवारी (दि.१) सापळा रचून कनिष्ठ अभियंत्याला लाच घेताना पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस उपायुक्त व पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे आणि अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक ज्योती पाटील करीत आहेत.