हडपसर : सातवनगगर येथील ग्रीन सिटीच्या लेबर कॅम्पमधील दहा झोपड्या शुक्रवारी सकाळी आगीत जळून खाक झाल्या. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. १० कुटुंबांच्या एक लाख रुपयांचे संसारोपयोगी साहित्य आगीत जळाले. सकाळी साडेअकरा वाजता आग लागली. हांडेवाडी रस्ता व सातवनगर येथील ग्रीनसिटीच्या बांधकामावरील कामगारांसाठी लेबर कॅम्प आहे. कामगार कामावर गेले असताना सकाळी आग लागली. त्या वेळी ज्येष्ठ महिला व गरोदर महिला झोपडीत होत्या. आग लागल्याचे समजताच त्या झोपडीबाहेर पळाल्या. मात्र, येथील १० कुटुंबांच्या जीवनावश्यक वस्तू आगीत जळून खाक झाल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. सुभाष गोपनर, बालाजी गोपनर, विश्वनाथ देवकते, नरसिंंह सुरनर, बालाजी दिंडे, व्यंकट शेडगे, मारुती शेडगे, अंकुश शेडगे, राजेंद्र, सुरवर आदींच्या झोपड्या जळून खाक झाल्या. (प्रतिनिधी)
सातवनगरमधील दहा झोपड्यांना आग
By admin | Updated: January 10, 2015 00:43 IST