पुणे : आपसी बदलीसाठी शिक्षक पती-पत्नी किंवा एकत्रित जोडी पाहिजे जोडी... या पोस्टरने मंगळवारी रास्ता पेठेतील राजा धनराज गिरजी शाळेत सर्वांचेच लक्ष वेधले आणि शिक्षक बदली प्रक्रियेवर काही प्रश्न उपस्थित केले.शुक्रवारपासून येथे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या बदल्या सुरू आहेत. त्यामुळे येथे गेले चार-पाच दिवस शिक्षकांची अक्षरश: जत्राच भरली आहे. मात्र, मंगळवारी दौैंड तालुक्यातील जयंत भोसले हे शिक्षक एक पोेस्टर तयार करून या शाळेच्या गेटसमोर उभे होते. या पोस्टरवर मजकूर होता... आपसी बदलीसाठी पती-पत्नी किंवा एकत्रित जोडी पाहिजे (उपशिक्षक). शाळा थोरात निगडेवस्ती- पट ३५, केंद्र पाटस (दौैंड). शाळा पाटस स्टेशनजवळ व हायवेपासून ५ किलोमीटर आहे. अपेक्षित तालुके बारामती, शिरूर, हवेली, इंदापूर व पुरंदर... या पोस्टरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते आणि अनेक प्रश्नही उपस्थित केले होते. प्रशासकीय बदल्यांअगोदर विनंती बदल्या केल्याने शिक्षकांवर ही वेळ आली होती. जर अगोदर विनंती बदली केली असती तर सोयीस्कर तालुका मिळाला असता. तो मिळाला नाही. आता बदलीसाठी आपसी बदलीसाठी प्रशासनाने तुमचा माणूस तुम्हीच शोधा, घेऊन या आणि बदली करून घ्या, अशी वेळ आमच्यावर आल्याने जोडी शोधण्यासाठी फिरावे लागले, असे भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ते म्हणाले, ‘‘मी आपसी बदलीसाठी जोडी शोधत होतो. या बदली प्रक्रियेमुळे सर्वांच्याच मनात संभ्रमावस्था निर्माण केली असून, ५0 टक्के शिक्षक धास्तावले आहेत. गैरसोयीच्या किंवा आदिवासी भागात जाऊ नये... ही भीती मनात असल्याने जोडी शोधण्याची वेळ आमच्यावर आली. २५-२५ वर्षे सेवा केल्यानंतर या बदली प्रक्रियेमुळे कोणतीही स्पष्टता नसल्यामुळे शिक्षकांच्या मनात ही भीती निर्माण झाली आहे. आम्ही दुर्गम भागात जायलाही तयार आहोत; मात्र आमच्यावर दुर्गम भागात जाण्याची वेळ कुणामुळे आली? याचं स्पष्टीकरणही प्रशासनाने करावे, असा सवालही भोसले यांनी केला आहे. गेले १५ दिवस जिल्हा परिषदेच्या वाऱ्या करतोय... गेले चार दिवस रात्री ११ वाजेपर्यंत थांबावे लागतेय याला जबाबदार फक्त प्रशासन आहे. यापूर्वी कधी बदली प्रक्रिया झाली नाही का? या वेळीच हा घोळ का? असे अनेक प्रश्न भोसले यांनी उपस्थित केले. (प्रतिनिधी)
शिक्षकांची जोडीसाठी झाली परवड
By admin | Updated: June 1, 2016 00:53 IST