पुणे : पुण्याच्या पश्चिम भागाला मुळशी धरणामधून ५ ते ७ टीएमसी पाणी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्याअनुषंगाने पालिका प्रशासनाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्र्यांसह मंत्रीगटासोबत पत्रव्यवहार करावा. तसेच, आगामी अंदाजपत्रकामध्ये सर्वेक्षणाची तरतूद करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने केली आहे. या मागणीला शिवसेनेही पाठिंबा दिला आहे.
शहराचा व्यास आणि लोकसंख्या वाढत्या नागरीकरणामुळे वाढली आहे. त्यामुळे स्वाभाविकच पाण्याची निकडही वाढली आहे. नुकतेच भामा आसखेड पाणी योजनेचे लोकार्पण केले आहे. या योजनेमधून पुण्याच्या पूर्व भागाला पाणी पुरवठा केला जाणार आहे. पश्चिम भागातील नागरिकांसाठी मुळशी धरणामधून पाणी पुरवठ्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांनी याबाबतची घोषणा नुकतीच केली आहे. या योजनेसाठी सर्वेक्षण करावे अशी मागणी करणारे पत्र नगरसेवक बाबुराव चांदेरे, दत्तात्रय धनकवडे, विशाल तांबे, गणेश ढोरे, प्रकाश कदम, प्रशांत जगताप, शिवसेना गटनेता पृथ्वीराज सुतार, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके, प्रदिप धुमाळ यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे.