पुणे : मागील वर्षभरात सोनसाखळीचोऱ्या रोखण्यासाठी शहर पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांची दखल बंगळुरू पोलिसांनीही घेतली आहे. बंगळुरूमध्ये होणाऱ्या सोनसाखळीचोऱ्या रोखण्यासाठी तेथील पोलीस पुणे पोलिसांचे मार्गदर्शन घेत आहेत. सोनसाखळी चोरीबाबत पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैैठकीत बंगळुरूचे पोलीस अधिकारीही हजर होते. बंगळुरू, भोपाळ या राजधानीच्या शहरांसह महाराष्ट्रातील सर्वच शहरांमध्ये सोनसाखळीचोरांनी धुमाकूळ घातला आहे. पुणे पोलिसांनी विविध उपाययोजना करून साखळीचोरीच्या घटना रोखण्यात काही प्रमाणात यश मिळविले. सोनसाखळीचोरांवर नियंत्रण आणण्यासाठी व माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी आज पुणे पोलीस आयुक्तालयात बैठक झाली. त्यामध्ये बंगळुरू, जळगाव, नागपूर, नगर यांसह अन्य शहरांतील सुमारे ८० पोलीस अधिकारी उपस्थित होते. बंगळुरू शहरात रोज सुमारे ७ ते ८ सोनसाखळीचोरीच्या घटना होत आहेत. या घटना रोखण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. त्याबद्दल तेथील उपायुक्त के. उमेश यांनी चर्चा केली. त्या वेळी पुणे पोलिसांनी नाकाबंदी कशी करावी, कोठे कारावी याचे सादरीकरण केले. या वेळी इतर पोलिसांना हव्या असलेल्या आरोपींची माहिती देण्यात आली. सोनसाखळी चोरीबाबत बंगळुरू व भोपाळमधील पोलीस अधिकाऱ्यांमध्ये समन्वय राहावा यासाठी अधिकाऱ्यांचा व्हॉट्स अॅप गु्रप तयार करण्यात आला आहे. सोनसाखळीचोरांना अटक झाल्यानंतर त्यांचे फोटो, माहिती या गु्रपवर टाकली जाणार आहे. या बैठकीमध्ये पुणे पोलिसांना हव्या असलेल्या दोन आरोपींची माहिती संगमनेर व बंगळुरू मिळाली आहे, अशी माहिती अपर पोलीस आयुक्त सी. एच. वाकडे, उपायुक्त पी. आर. पाटील व सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र जोशी यांनी दिली.
सोनसाखळीचोऱ्यांना यशस्वी प्रतिबंध
By admin | Updated: February 10, 2016 03:30 IST