कोरेगाव भीमा : राज्यातील सेवाभावी संस्थेद्वारे चालविण्यात येणाऱ्या १२३ अपंग विशेष मुलांच्या शाळा व कर्मशाळांना राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के अनुदान मंजूर करण्यात आले. यामधील पुणे जिल्ह्यातील १२ विशेष शाळांचा समावेश आहे. सातत्याने पाठपुरावा केल्याने सर्व शाळाप्रमुखांनी ‘लोकमत’चे आभार व्यक्त केले. गेल्या १५ वर्षांपासून अनुदान मिळण्यासाठी राज्य अपंग कृती समितीच्या माध्यमातून शिक्षक, विद्यार्थी, संस्थाचालकांनी अनेकदा आंदोलने केली. त्या प्रयत्नांना अखेर यश आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी गेल्या १५ वर्षांपासूनचा प्रलंबित व अत्यंत निकडीचा विषय मार्गी लावला आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी, विद्यार्थी, पालक व संस्थाचालकांमध्ये समाधानाचे वातावरण व न्याय मिळाला आहे, अशी भावना पुणे जिल्हा अपंग कृती समितीचे पवन कट्यारमल यांनी व्यक्त केली. राज्यातील ८९ मतिमंद, १७ अस्थिव्यंग, १४ मूकबधिर व ३ अंध प्रवर्ग मिळून ‘अ’ श्रेणीतील १२३ शाळा व कर्मशाळा अनुदान पात्र झाल्या आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या शाळांनाच शंभर टक्के अनुदान देण्यात येत असल्याचे ८ एप्रिल २०१५ च्या शासन निर्णयात जाहीर करण्यात आले आहे. या शाळांना अनुदान मिळण्यासाठी अपंग कृती समितीद्वारे विशेष मुलांसह आंदोलन करून शासनदरबारी हा प्रश्न सतत मांडण्यात आला होता. त्यासाठी संबंधित सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयांवर मोर्चा काढण्यात आला होता. वाढत्या महागाईमुळे या शाळा चालविणे व मुलांच्या संगोपनाचा प्रश्न ऐरणीवर होता. या विशेष मुलांच्या बहुतांश शाळा या निवासी असल्याने त्या मुलांचा खर्च भागविताना संस्थाचालक मेटाकुटीला आले होते. १५ वर्षांचा प्रलंबित अनुदानाचा विषय मार्गी लागल्याचे शासनाने जाहीर करताच महाराष्ट्र राज्य कृती समितीचे अध्यक्ष रमेश भंडारी यांनी तत्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले होते. (वार्ताहर)अनुदानास पात्र असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील शाळाअपंग रोजगार उद्योग व तांत्रिक प्रशिक्षण केंद्र (मोहननगर, चिंचवड), मूकबधिर निवासी शाळा (बारामती), स्व. सुभाषअण्णा कुल मतिमंद मुलांची शाळा (दौंड), महावीर मतिमंद निवासी विद्यालय (लोणी काळभोर), सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालय (वाडा पुनर्वसन कोरेगाव भीमा), संत गजानन महाराज शिक्षण संस्था (उरुळी कांचन), प्राजक्ता मतिमंद निवासी विद्यालय (सुपे, बारामती), मनोविकास मतिमंद मुलांची शाळा (पुणे कॅम्प), श्री छत्रपती प्रतिष्ठान मतिमंद निवासी विद्यालय (सिंहगड रोड, हिंगणे), ज्ञानगंगोत्री मतिमंद निवासी विद्यालय (धायरी गाव), श्री स्वामी समर्थ व्यायाम मंडळाची मतिमंद शाळा (इंदापूर), इंटरविडा जागृती बहुविकलांग मुलांची शाळा (मुंढवा). अनुदानाच्या निर्णयामुळे ‘लोकमत’चे सर्वत्र कौतुक४विशेष मुलांच्या २००२ सालापासूनचा शाळांच्या अनुदानाचा विषय ‘लोकमत’ने सातत्याने मांडला होता. त्यामुळे शासनाने आज जाहीर केलेल्या अनुदानाच्या निर्णयामुळे ‘लोकमत’च्या माध्यमातून विद्यालयास अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. ४त्या सर्व दानशूरांचे ऋ ण मानावे तेवढे कमी असून विशेष शाळांना सुरुवातीपासूनच अनुदान मिळणे गरजेचे असल्याचे पुणे जिल्हा अपंग संस्था कृती समितीचे पवन कट्यारमल यांनी सांगितले.
१५ वर्षांपासूनच्या लढ्याला आले यश
By admin | Updated: April 11, 2015 22:50 IST