पुणे : राज्यातील विद्यापीठांच्या विविध अधिकार मंडळांच्या निवडणुका एक वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आल्या असून, त्याला विद्यार्थीही अपवाद नाहीत. शासनाकडून विद्यापीठ व महाविद्यालयातील विद्यार्थी निवडणुकांसाठी नवीन नियमावली तयार केली जात आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थी संघटनांचीही त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. मात्र, सद्यस्थितीतील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी काही महाविद्यालयात झालेल्या विद्यार्थी निवडणुकांना मान्यता द्यावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे.विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार विद्यापीठ अधिकार मंडळावरील कोणत्याही पदाच्या निवडणुका येत्या ३१ आॅगस्ट २०१६ पर्यंत घेण्यात येणार नाहीत, असे राजपत्र प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात जुन्या पद्धतीने महाविद्यालय स्तरावर निवडून आलेल्या विद्यार्थ्यांमधून विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर विद्यार्थ्यांची निवड होणार नाही. तसेच महाविद्यालयात निवडून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींच्या पदाला कायदेशीर आधार राहिलेला नाही. येत्या हिवाळी अधिवेशनात नवीन विद्यापीठ कायदा मंजूर करण्याबाबत राज्य शासन प्रयत्नशील आहे. तसेच लिंगडोह समितीच्या शिफारशी आणि विविध स्तरातून येणाऱ्या सूचनांचा विचार करून पुढील काळात विद्यार्थी निवडणुका घेतल्या जातील, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नॅशनल स्टुडंट युनियन आॅफ इंडीया (एनएसयुआय), अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, युवा सेना आदी विद्यार्थी संघटनांनी निवडणुकांच्या दृष्टीने तयारीला सुरुवात केली आहे.विद्यार्थी संघटनांनी निवडणुकांची तयारी सुरू केली असली तरी निवडणुका कशा होतील? याबाबत शासनाने स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. वर्षभर निवडणुका होणार नसतील तर या कालावधीत विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याबाबत शासनाने कोणत्याही उपाय योजना केलेल्या नाहीत. विद्यार्थी संघटना तयार आहेत, परंतु, शासनाकडूनच यावर लवकर निर्णय घेतला जात नसल्याचे काही विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी सांगत आहेत. (प्रतिनिधी)
विद्यार्थी संघटनांची निवडणूक तयारी सुरू
By admin | Updated: September 14, 2015 04:53 IST