शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदाशिव कोहिणकर यांनी पोलिसांत मुख्याध्यापकाविरोधात लेखी तक्रार देऊन चौकशीची मागणी केली आहे. दोंदे येथे भैरवनाथ माध्यमिक विद्यालय आहे. कोरोनाच्या काळात विद्यालय बंद आहे. मात्र ऑनलाईन शिक्षण सुरू असून शिक्षक नियमितपणे उपस्थित असतात. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संबंधित मुलगी इयत्ता आठवीमध्ये असलेल्या भावाची अभ्यासासाठी नेलेली पुस्तके परत करण्यासाठी आली होती. त्या वेळी मुख्याध्यापक गारगोटे यांनी आपल्या कार्यालयात बोलावून विद्यार्थिनीशी लज्जा उत्पन्न होणारा प्रकार केला. मुलीने घरी जाऊन पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर दोन दिवसांनी पालकांनी महिला शिक्षकांना मोबाईलवरून हा प्रकार सांगितला. विनयभंगाची चर्चा सुरू झाल्यावर मुख्याध्यापक गारगोटे याने संस्था सचिवांकडे रजेचा अर्ज देऊन भीतीपोटी घरी बसणे पसंत केले. पालकांनी बदनामी होईल म्हणून संस्थेकडे तक्रार करण्यापलीकडे कुठेही वाच्यता केली नाही. संस्थाचालकांनी मुख्याध्यापकाशी संवाद साधण्यासाठी प्रयत्न केले. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. १० जुलैला खेड पोलीस ठाण्यात पत्र दिले. त्याच्यावर चौकशी सुरू असल्याचे सांगितले गेले. एका संस्थेच्या माध्यमातून तक्रार होऊन देखील कारवाईत दिरंगाई झाल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे. पालकांना तक्रार देण्यासाठी विनंती केली, मात्र त्यांनी ती अमान्य केली.
मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:09 IST