उर्से : माणसाच्या हव्यासामुळे, वनव्यामुळे मावळ तालुक्यातील जैवविविधता व प्राणीजीवन धोक्यात आले असून, वन्यप्राण्यांची जगण्यासाठी धडपड सुरू आहे. यासाठी स्थानिक ग्रामपंचायत व निसर्गप्रेमींनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. वन्यजीव प्राणिप्रेमींकडून मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रम व योजना राबविण्याविषयी कार्यक्रम घेतले जातात. मात्र, कार्यक्रमानंतर या सर्व गोष्टींचा सर्वांनाच विसर पडतो. वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी शासनाने वेळोवेळी अनेक कायदे केले असले, तरी वन्यजीव आजही जगण्यासाठी मोठ्या प्रमाणात धडपडताना दिसत आहेत. मात्र, याबाबतची दखल घेतली जात नाही. दिवसेंदिवस मानवी वस्ती तालुक्यातील डोंगराळ आदिवासी भागात सरकत आहे. जंगलातील झाडांच्या व पाण्याच्या ठिकाणी मानवाने मोठे अतिक्रमण केले आहे. त्यामुळे तरस, बिबट्या, हरण, ससे, रानडुकरे, रानमांजर व इतर छोटे-मोठे भूचर प्राणी यांची संख्या कमी झाली आहे. (वार्ताहर)अन्नाचा शोध : गावांमध्ये वाढला वावरपाण्याच्या शोधात, तसेच अन्न मिळविण्याच्या धडपडीत आज या डोंगरावरील वन्यजीवांची संख्या आता कमी झाली आहे. पाण्यासाठी व अन्नासाठी गावात येण्याच्या धडपडीत आत्तापर्यंत अनेक प्राण्यांना द्रुतगती महामार्गावर जीव गमवावा लागला आहे. अनेक शहरी धनिकांनी गुंतवणूक म्हणून ग्रामीण भागातील डोंगर खरेदी केले आहेत. आणि कोट्यवधींची स्थावर मालमत्ता सुरक्षित राहावी म्हणून त्याला तारेचे कुंपणही केले आहे. त्यामुळे हजारो वन्य जीवांचे वास्तव्य असणाऱ्या या वन जमिनीमध्ये कुंपणाचे जाळे निर्माण झाले आहे. या कुंपणामुळे या वन्य प्राण्यांवर मोठे संकट निर्माण झाले आहे.वातावरण अनुकूल बनविण्याची गरज डोंगरांवर जास्तीत जास्त वृक्षारोपण करून पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे बनले आहे. याकरिता स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था व वन विभाग यांनी संयुक्तपणे काम केल्यास येथील वन्य जीवांचे हाल थांबवावेत.डोंगराळ भागातील प्राण्यांची वाताहतमावळ तालुक्याला मोठा डोंगर परिसर लाभला आहे. त्यामधून अनेक जीवांचे वास्तव्य पहावयास मिळते. बेडसेची लेणी, राजमाची किल्ला, कार्ल्याची लेणी, घोरवडेश्वर येथील लेणी, लोहगड किल्ला, तिकोणा किल्ला, लोणावळा येथील डोंगर दरीतील भाग या परिसरातील डोंगरदऱ्यांत वेगवेगळे प्राणी आपले वास्तव्य करून राहत आहेत. त्याचबरोबर लोणावळा-खंडाळा पासून ते पवना धरण व ठोकळवाडी, आंद्रा व शिरदे धरणापर्यंत डोंगरभाग व पसरलेल्या सपाट प्रदेशातही अनेक वन्यजीवांचे अस्तित्व आढळून येते. तालुक्यातील झपाट्याने वाढत्या नागरीकरणामुळे वन्यजीवांच्या वास्तव्यात अडथळा निर्माण झाला आहे. १५ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या द्रुतगती महामार्गामुळे या लगत असणाऱ्या वन्यजीव प्राण्यांची वाताहत झाली.
प्राण्यांची जगण्यासाठी धडपड
By admin | Updated: March 12, 2017 03:24 IST