पुणे : महापालिका निवडणुकीची उमेदवारी जाहीर करताना सर्वच राजकीय पक्षांनी बंडखोरी होऊ नये यासाठी अर्ज मागे घेण्याच्या काही तासांपूर्वी ए व बी फॉर्मचे वाटप केले. मात्र, इतकी दक्षता घेऊनही अनेक ठिकाणी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात कार्यकर्त्यांनी बंडखोरी करून अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. काही ठिकाणी अर्ज दाखल झाले नसले, तरी कार्यकर्त्यांच्या मनात उमेदवारीवरून तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. निवडणुकीमध्ये या नाराजीचा पक्षाला फटका बसू नये तसेच पक्षाच्या बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावे यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे.महापालिका निवडणुकांसाठी २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या काळामध्ये जागांसाठी २६६१ अर्ज निवडणूक कार्यालयांमध्ये जमा झाले आहेत. यातील अनेक अर्जांवर विरोधी उमेदवारांकडून आक्षेप घेण्यात आले. त्यामुळे शनिवारी सकाळी ११ वाजता सुरू झालेली अर्जांची छाननी प्रक्रिया अनेक कार्यालयांमध्ये रविवारी पहाटेपर्यंत सुरू राहिली. घोले रोड व भवानी पेठ निवडणूक कार्यालयांमधील छाननी प्रक्रिया, तर रविवारी सायंकाळपर्यंत सुरू होती. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार व पदाधिकारी या प्रक्रियेत अडकून पडले होते. सोमवार (६ फेब्रुवारी) व मंगळवार (७ फेब्रुवारी) या दोन दिवशी सकाळी ११ ते ३ या वेळेत अर्ज मागे घेता येणार आहेत. बंडखोरांची समजूत काढण्यासाठी त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून पालिकेत घेऊ यापासून ते संघटनेतील विविध पदे देण्याचा शब्द दिला जात आहे. काही ठिकाणी बंडखोरांनी ‘अर्थ’पूर्ण माघार घ्यावी, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद या नीतीचा अवलंब केला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. भाजपाकडे इच्छुकांची संख्या यंदा खूपच मोठी असल्याने सर्वाधिक बंडखोरी व नाराजीचे चित्र त्यांच्याकडे पहायला मिळत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यंदा पहिल्यांदाच आघाडी करून निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरत बंडखोरी केली आहे. काही जागांवर तडजोड करणे शक्यच नसल्याने दोन्ही पक्षांच्या मैत्रीपूर्ण लढतीही पहायला मिळणार आहेत. शिवसेना, मनसे, रिपाइं यांनाही काही ठिकाणी बंडखोरी व नाराजीचा सामना करावा लागला आहे. अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारांनी दुसऱ्या पक्षांमध्ये उड्या मारल्या आहेत.
बंडोबांना शांत करण्याची जोरदार मोहीम
By admin | Updated: February 6, 2017 06:24 IST