पुणे - नाटक म्हणजे प्रगल्भ शब्दांचे भांडार! महाराष्ट्राला रंगभूमीची समृद्ध परंपरा लाभली आहे. रंगभूमीने कलावंत, रसिकांना संवादातून, गीतांमधून शब्दांची पाखरण करीत समृद्ध केले. युवा रंगकर्मींना रंगभूमीची समृद्धी ‘वाचिक रंग कट्टा’ मधून अनुभवता येणार आहे. अभिवाचनातून रंगभूमीचा प्रवास, बदलते प्रवाह यांचा इतिहास जिवंत होणार आहे. कीर्ती शिलेदार, दीप्ती भोगले यांच्या पुढाकाराने मराठी रंगभूमीच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे.रंगभूमीला उर्जितावस्था मिळावी, नाटक नव्या पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरूआहेत. रंगभूमीची व्याप्ती खूप मोठी आहे. मुलुंड येथे झालेल्या नाट्य संमेलनामध्ये सादर झालेल्या भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांमधून ही व्याप्ती अनुभवता आली. संमेलनामध्ये अध्यक्षीय भाषण हा महत्त्वाचा भाग असतो. मेधा शिधये यांनी २००० सालापर्यंतच्या नाट्य संमेलनाध्यक्षांच्या भाषणाचे पुस्तक- रूपात संकलन केले आहे. प्रत्येक नाट्य संमेलनाध्यक्षांचे रंगभूमीवरील योगदान, विचारांची शैैली याचे प्रतिबिंब अध्यक्षीय भाषणावर उमटलेले पाहायला मिळते. पु. बा. भावे, आचार्य अत्रे, वसंत देसाई, प्रभाकर पणशीकर आदींचे विचार वाचिक अभियानातून युवा रंगकर्मींसमोर मांडल्यास त्यांची जाण वाढेल, या विचाराने ‘वाचिक रंग कट्टा’ ही कल्पना प्रत्यक्षात येत असल्याची माहिती दीप्तीभोगले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर २७ जुलैै रोजी पु. बा. भावे यांच्या भाषणाने ‘वाचिक रंग कट्टा’ या अभिनव उपक्रमाचा श्रीगणेशा होणार आहे. कीर्ती शिलेदार यांच्यासह आणखी दोन रंगकर्मी भाषणाचे अभिवाचन करणार आहेत. नाटकांचे विचार अभिवाचनातून नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. अध्यक्षीय भाषणांप्रमाणेच जुने संदर्भग्रंथ, नाटकाचा प्रवास उधृत करण्यात आलेले ग्रंथ अशा विविध विषयांचा अभिवाचनात समावेश करण्यात येणार आहे. यामुळे युवा पिढी नाटकातील विविधांगी घटकांचा विचार करण्यास प्रवृत्त होईल. सध्याच्या पिढीतील वाचनाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यातही रंगभूमीशी संबंधित लिखाण कमी प्रमाणात वाचले जाते.वाचण्यापेक्षा नाटकाची गोष्ट ऐकायला मिळाल्यास ही पिढी जास्त प्रमाणात आकृष्ट होईल आणि अभिवाचनाची नवी चळवळ उभारी घेईल, अशी आशा दीप्ती भोगले यांनी व्यक्त केली.दर महिन्याला आयोजन; सूरसंगतपासून श्रीगणेशावाचिक रंग कट्टा दर महिन्यातून एकदा रंगणार आहे. दर महिन्याच्या उपक्रमाला विविधांगी पद्धतीने सादर केले जाणार आहे.जयराम शिलेदार यांच्या ‘सूरसंगत’ या आत्मचरित्रातील काही ओळींमधून श्रीगणेशा करण्यात आला आहे. ‘पूजनीय किर्लोस्करांमुळे मी सहजतेने बोलू शकतो, देवलांमुळे घरगुती रंग भरू शकतो, खाडिलकरांमुळे समर्थपणे शब्द उच्चारू शकतो.गडकऱ्यांमुळे शब्दांच्या जादूचा अनुभव येतो. एरव्हीच्या साध्या बोलण्यातूनही काही प्रगल्भ शब्दांचा सहजच वापर होतो. महान नाटककारांचे शब्द बोलल्यामुळे या लेखकांची भाषा, महान दिग्दर्शकांनी आमच्याकडून घोकून घेतल्यामुळे उच्चार कधी स्पष्ट झाले हे कळलेच नाही.४नाटक करता करता शब्दांच्या भांडारात मुक्तपणे हिंडून श्रीमंत झालो,’ अशा जयराम शिलेदार यांच्या भावना त्यांच्याच शब्दांत मांडण्यात आल्या आहेत.
वाचिक कट्टा रंगणार , अभिनयातून नाटकाची गोष्ट उलगडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 4:15 AM