लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार काय...त्यांना असे वाटते सर्वकाही केंद्र सरकारने करावे. मास्क काय किंवा पीपीई काय, औषधे काय प्रत्येक गोष्ट केंद्राने द्यावी. राज्याने आधी पेट्रोलवरील दहा रुपये कर कमी करावा, मग केंद्राकडे पाच रुपये कमी करण्याची मागणी करावी, सगळे द्या-द्या असे कसे चालणार,” असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.
कॉंग्रेसने इंधन दरवाढीविरोधात सोमवारी (दि. ७) राज्यस्तरीय आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर पाटील पुण्यात बोलत होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये अस्वस्थता असल्याचा दावा केला होता. यासंदर्भात पाटील म्हणाले, “नाथाभाऊ आमचे नेते आहेत. तिकडे गेल्यावर तरी त्यांनी खरे बोलावे. दीड वर्षात त्यांनी एकही आंदोलन केले नाही. आम्ही अनेक आंदोलने केली. पंढरपूरही जिंकलो.”
“खडसे यांच्या म्हणण्याने वस्तुस्थिती काही बदलत नाही,” असे पाटील म्हणाले. त्यांनी सांगितले की, आम्हाला धोका दिला गेला, फसवले गेले याचे दु:ख आहे. पण भाजपमध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता नाही. भाजपमध्ये मतभेद नाहीत आणि असतील तरी ते सोडवण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. ‘जो पक्ष सोडून जाईल तो आहे तिथे सुखी राहावा’, अशी आमची पद्धत असल्याचे पाटील म्हणाले.
पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेना ८० जागा लढवणार असल्याचे शिवसेना नेते संजत राऊत यांनी नुकतेच सांगितले. त्यावर पाटील म्हणाले, “संजय राऊतांचे नाव घेऊन माझा दिवस का बिघडवता? त्यांनी ८० नव्हे २८० जागा लढवाव्यात. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत.”