केशवनगर गाव हे साधारण दोन-तीन वर्षांपूर्वी महानगरपालिकेत समाविष्ट झालेले आहे. या गावाची लोकसंख्या आता एक लाखांच्या आसपास झाली आहे. येथील नागरिकांना कोविड १९ लस घेण्यासाठी मुंढवा येथील कै. सखाराम कुंडलिक कोद्रे कुटीर रुग्णालयात जावे लागत आहे. त्यामुळे केशवनगर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. येथील कोद्रे कुटीर रुग्णालयातही लसीकरण यंत्रणेवर ताण निर्माण होत आहे. यासाठी केशवनगर येथील नागरिकांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र तातडीने उभारणे गरजेचे झाले आहे.
याविषयी पुणे शहर भाजपचे सरचिटणीस संदीप लोणकर म्हणाले, केशवनगर परिसर आता झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे येथील लोकसंख्येमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. हे पाहता याच ठिकाणी स्वतंत्र लसीकरण केंद्र उभारले तर नागरिकांची मोठ्या प्रमाणात सोय होईल. केशवनगर येथील भोईवस्ती (रेणुका मातामंदिराजवळ) पुणे मनपाची शाळा येथे महानगरपालिकेने केशवनगर भागातील नागरिकांसाठी त्वरित कोविड १९ लसीकरण केंद्र सुरू करावे.
फोटो ओळः केशवनगर येथे कोविड १९ लसीकरण केंद्र सुरू करावे यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांना संदीप लोणकर यांनी निवेदन दिले.