पिंपरी : केंद्र सरकारने पाचशे आणि हजारांच्या नोटा चलनातून हद्दपार केल्याचा फटका एसटी महामंडळालही बसला आहे़ सुट्या पैशांच्या अभावी शहरातील वल्लभनगर येथील एसटी आगारात प्रवाशांची संख्या कमालीची घटली आहे़ परिणामी, एसटीच्या उत्पन्नावर याचा मोठा परिणाम होत आहे़ राज्यभरातील अनेक आगारांतून विविध भागांतील एसटी वल्लभगनरच्या आगारात दाखल होत असतात़ मात्र, गेल्या चार दिवसांपासून पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बंद झाल्याने आणि नवीन चलनात आलेल्या दोन हजाराच्या नोट प्रवाशाने दिल्यानंतर त्याला परत सुटे पैसे देण्यासाठी चालकाकडे पैसे नसल्यामुळे प्रवाशी आणि वाहकांमध्ये तू-तू, मै-मै होत आहे़ दिवाळीनंतर गावाहून शहरात दाखल होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते़ मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुट्या पैशांचा तुटवडा एसटी महामंडळाला जाणवत आहे़ त्यामुळे प्रवाशांची संख्यादेखील कमी झाल्याने एसटीच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे़ अनेक नागरिक उद्योगनगरीत कामाच्या निमित्ताने दाखल होत असतात़ मात्र दोन दिवसांत एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत निम्म्याने घट झाल्याचे वाहतूक नियत्रंक अमर गोडसे यांनी सांगितले़ त्यामुळे राज्याच्या विविध आगारांतून येणाऱ्या अनेक एसटीमधील सीट्स अर्धे रिकामे राहत असल्याचे दिसून येत आहे़ सरकारने नोटा चलनातून हद्दपार करण्यासाठी घेतलेला निर्णयाचे एसटी प्रवाशांकडून स्वागत करण्यात येत आहे़ मात्र, सुट्या पैशांअभावी होणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची माहिती प्रवासी संजय मिटे यांनी दिली़ (प्रतिनिधी)
सुट्या पैशांअभावी एसटी प्रवासी घटले
By admin | Updated: November 14, 2016 02:52 IST