शेलपिंपळगाव : बदललेल्या हवामानाचा रब्बी हंगामातील पिकांवर तसेच पशुधनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. पिकांवर विविध रोग झडू लागले आहेत. पिकांवर मावा, पीळ तसेच अळी रोगाची सर्वाधिक लागण झाली आहे. त्यामुळे बाधित पिके वाचविण्यासाठी महागड्या रासायनिक औषधांची फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तर पाळीव दुग्धजन्य प्राणी लाळ, खुरकुद, लखवा आदी रोगाला बळी पडत आहे. यावर आळा बसविण्यासाठी बळीराजाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. दोन दिवसापूर्वी ‘आक्टोंबर हिट’ तीव्रता चांगलीच जाणवत होती. त्यामुळे लागवडयुक्त पिकांना उष्णतेचा मोठा सामना करावा लागत होता. जास्त उन्हामुळे फळ पिकांवर पाढरे डाग पडू लागले होते. मात्र दोन दिवसांपासून आकाशात अचानक ढगांची वर्दळ वाढून पावसाची परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. वाढत्या उन्हाच्या झळा तसेच बदलेले दूषित हवामान फ्लॉवर पिकांवर थेट परिणाम करू लागले आहे. दूषित वातावरणामुळे या पिकाच्या लागवडीनंतर अवघ्या काही दिवसातच पिकाला लहान-लहान गड्डे येऊ लागले आहेत. लहान वयात लागलेले पिक म्हणजे बाद झाल्याची पावती असते. परिसरात अनेक ठिकाणी पिकांची हीच अवस्था पाहवयास मिळत आहे. (वार्ताहर)
महागड्या औषधांची फवारणी
By admin | Updated: October 27, 2014 03:38 IST