पुणे : धायरी उड्डाणपूल कार्यान्वीत होऊनही सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे पालिकेचे नगरसेवक, अधिकारी व वाहतूक पोलिसांनी एकत्रित येऊन धायरीतील वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी ‘लोकमत आपल्या दारी’च्या व्यासपीठावर आज केली. त्या वेळी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली. प्रभाग क्र. ५४ मधील धायरी फाटा, गावठाण, गणेशनगर व सनसिटी येथील नागरिकांच्या सार्वजनिक समस्या सोडविण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ हा कार्यक्रम मुक्ताई गार्डन येथे बुधवारी झाला. त्यावेळी स्थानिक नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, नगरसेविका युगंधरा चाकणकर, वृक्ष संवर्धन समिती सदस्य मिलिंद पोकळे, सहायक आयुक्त जयंत भोसेकर, पोलीस निरीक्षक (वाहतूक विभाग) एम. जी. काळे, विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश बेंडे, विभागीय आरोग्य निरीक्षक गणेश कांबळे, उपअभियंता संजय पागे, जयंत नाझरे, अतिक्रमण विभागाचे शशीकांत टाक आदी उपस्थित होते. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांनी स्वागत केले. ते म्हणाले, ‘‘आक्रमक पत्रकारिता करीत असतानाच लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांमध्ये संवादाचा पूल बांधणे ही ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रमामागील कल्पना आहे. नागरिकांना समस्या मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ यामुळे मिळाले आहे.’’ (प्रतिनिधी)
धायरीची वाहतूककोंडी सोडवा..!
By admin | Updated: January 15, 2015 00:16 IST