दौंड : आपल्याकडे असलेल्या योग ज्ञानाचा उपयोग करुन अर्धांगवायू आणि शारिरीक व्याधी असलेल्यांच्या घरी जाऊन मोफत उपचार करणे, त्यातून त्यांचे जीवन सुसाह्य होण्यास मदत करणे़ वारीत आलेल्या वारकऱ्यांचे पाय चेपून देऊन सेवा करणे़ आजवर ५ हजारांहून अधिक लोकांना योग शिक्षण देऊन राजू गजधने यांनी योगशिक्षणातून सामाजिक बांधिलकीची जपली आहे़ दौंड येथील योग शिक्षक राजू गजधने केवळ सामाजिक बांधिलकीतून सर्व जाती धर्मातील लोकांना गेल्या काही वर्षांपासून मोफत योगासनाचे धडे देत आहेत. आजपावेतो त्यांनी पाच हजारांच्या जवळपास महिला आणि पुरुषांना योगाचे प्रशिक्षण दिले आहे. तर शालेय विद्यार्थ्यांना देखील योगाचे महत्व त्यांनी पटवून दिले आहे. पशुपक्षी, निसर्गातील वेगवेगळी झाडे, पाले-मुळे यांचा त्यांनी अभ्यास करुन आयुर्वेदिक उपचार देखील आत्मसात केले. त्यांनी २00९ ला हरिद्वार येथे पतंजली योग समितीत योगाची अधिकृत दीक्षा घेतल्याने त्यांची दौंड तालुका पतंजलीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. (वार्ताहर)-दरम्यान २२ फेब्रुवारी २00४ ला त्यांनी येथील रेल्वे कामगार मैदानावर योग प्रशिक्षणाचे कार्य सुरु केले. ते अविरीतपणे सुरु आहे. स्वत: पहाटे साडे तीनला उठून घरी योगासन करणे, त्यानंतर पहाटे पाच वाजता मैदानावर प्रशिक्षणार्थींना योगाचे धडे देणे हे त्यांचे कार्य. सुरुवातीला त्यांच्याकडे ४ लोक प्रशिक्षण घेत असत. मात्र आजमितीस २५0 च्या जवळपास प्रशिक्षणार्थी योगाचे धडे घेत आहेत. अशीही सेवा-अर्धांगवायू झालेले आणि शारिरीक व्याधी असलेल्या लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या शरीराची विनामुल्य मसाज करणे हा देखील गजधने यांच्या सामाजिकतेचा नित्यनियमाने उपक्रम आहे. तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ््यातील वारकऱ्यांचे पाय दाबून त्यांची सेवा उंडवडी येथे गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. एकंदरीतच गजधने यांच्या या कार्याची पावती म्हणून मान्यवरांनी त्यांचा गौरव केलेला आहे. शिक्षकांना योगशिक्षण -२१ जुलैला जागतिक योगदिन साजरा करण्यात येणार आहे. तेव्हा शालेय विद्यार्थ्यांना योगाचे धडे वेळीच मिळावे म्हणून दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या २0 केंद्रातील १00 शिक्षकांना राजू गजधने यांनी योगाचे धडे दिले. की जेणेकरुन विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच व्यायामाची आवड निर्माण होईल. तेव्हा या जागतिक योगदिन निमित्ताने येथील रेल्वे कामगार मैदानावर पहाटे ५ वाजता योग दिन साजरा करण्यात येणार आहे़
योगातून सामाजिक बांधिलकी
By admin | Updated: June 21, 2015 00:01 IST