माळेगाव : विरोधात तक्रार दिल्याचा राग मनात धरून अंगणवाडी कार्यकर्तीला दारूविक्रेत्यांनी केलेल्या मारहाणीचा महिलांनी निषेध व्यक्त केला. यासाठी शेकडोंच्या संख्येने महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. या महिलांनी पोलीस ठाण्यावरच धडक मोर्चा काढून निषेध नोंदवला. तसेच, माळेगावमध्ये कायमस्वरूपी दारूबंदी करण्याची मागणी केली. दारूबंदीची मागणी करणाऱ्या महिलेला प्रजासत्ताकदिनी विवस्त्र करण्याचा प्रयत्न करून दारूविक्रेत्यांनी मारहाण केली. त्यानंतर तिघा दारूविक्रेत्यांना पोलिसांनी अटकदेखील केली. मात्र, या घटनेचे जोरदार पडसाद उमटले. सर्व सामाजिक , राजकीय स्तरातून या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. बुधवारी (दि. २८) महिलांनी निषेध मोर्चा माळेगाव ग्रामपंचायतीपासून पोलीस चौकीवर नेला. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेत्यापासून बारामती तालुक्यातील सर्वच अंगणवाडी सेविकांनी उत्स्फूर्त भाग घेतला. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. ग्रामपंचायतीपासून मोर्चास सुरुवात होऊन मोर्चा माधवानंद थियटरमार्गे बारामती-नीरा राज्यमार्गाने पोलीस चौकीवर पोहोचला. या वेळी महिलांनी दारूबंदी, गुटखा, मटका व इतर अवैध धंदे त्वरित बंद करण्याची घोषणाद्वारे मागणी केली. या वेळी महिलांनी व गावपुढाऱ्यांनी पोलीस चौकीस निवेदन दिले. या निवेदनाचा स्वीकार बारामतीचे नायब तहसीलदार अडागळे, बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे यांनी स्वीकारले. महिलांनी अंगणवाडीकर्तीला झालेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त केला.बारामती तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्ष वनिता बनकर, बारामती पंचायत समिती सदस्या संगीता ढवाण, माळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सविता बुरुंगले, पुणे जिल्हा परिषद सदस्या लता भोसले आदींनी निषेध नोंदवला. या वेळी माळेगावमधील सर्वच अवैध धंदे त्वरित बंद करण्याची मागणी पोलीस प्रशासनास करण्यात आली. या वेळी माळेगाव कारख्यान्याचे संचालक दीपक तावरे, जिल्हा परिषद सदस्या लता भोसले, प्रियांका चव्हाण, पंचायत समिती सदस्या सुदर्शना तावरे, सदस्य दिलीप तावरे, बंटी तावरे, जयदीप तावरे, प्रदीप तावरे, अमित तावरे, उपसरपंच सचिन तावरे, माजी उपसरपंच वसंतराव तावरे, दादा पाटील तावरे, लालासाहेब चव्हाण, अविनाश भोसले, महेश कदम, अनिल मदने, विश्वास भोसले, अशोक सस्ते, ननू तावरे, शिवराज जाधवराव आदी उपस्थित होते.
दारूबंदी झालीच पाहिजे
By admin | Updated: January 28, 2015 23:39 IST