लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : खेड-शिवापूर टोल नाक्यावरील बोगस पावत्यांच्या रॅकेट प्रकरणी टोल कर्मचाऱ्यांसह टोलचालक व टोल अधिकारी यांचा देखील सहभाग असल्याची शक्यता आहे. या प्रकरणाची एसआयटीची नेमणूक करून चौकशी करावी, अशी खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीच्या वतीने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
टोल नाका हटाव कृती समितीचे कायदेशीर सल्लागार ॲड
नितीन दसवडकर यांच्या नेतृत्वात पद्माकर कांबळे सतीश हंचाटे, मनोज शिंदे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबत सोमवारी निवेदन देण्यात आले. वाहनचालक अभिजित बाबर यांच्या तक्रारीनुसार तातडीने कारवाई करत पोलिसांनी बोगस पावत्याचे राकेट उघड केल्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन केले. हे प्रकरण फक्त कर्मचाऱ्यांनापुरते मर्यादित नसून यामध्ये टोलचालक कंपनी व टोलवरील अधिकारी यांचे देखील संगनमत असल्याची शक्यता आहे. या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई होणे गरजेचे आहे. यामधून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता आहे. किती दिवस हा प्रकार सुरू होता याची चौकशी होणे गरजेचे आहे. या प्रकरणासाठी स्वतंत्र चौकशी समिती (एसआयटी) ची नेमणूक करण्यात येऊन सखोल चौकशी करण्याची मागणी टोल हटाव कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान कृती समितीच्या निवेदनानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी या प्रकरणी शासनाची फासवणूक झाल्याची शक्यता असल्यामुळे बारामती विभागाचे अप्पर पोलीस आधीक्षक मिलिंद मोहिते याची स्वतंत्र तपास अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. या बोगस पावत्या प्रकरणी मास्टर माईड कोण ? या प्रकरणात अनेक बडे नावे असल्याची चर्चा आहे.