पुणे : मी मुक्तपणे गातो. लोक काय म्हणतील याची परवा करीत नाही. स्वत:ला बांधून न घेता गायलं की मैफल अधिक वर जाते आणि हेच त्या गायनाचे यश असते. मी गाताना स्वत:ला विसरून जातो. कसा दिसतोय, दाढी किती वाढली, माईक कुठं आहे... हे काहीही माहिती नसते, अशा संवादातून ज्येष्ठ संगीतकार पं. हदयनाथ मंगेशकर संगीताची ‘भावसरगम’ उलगडत होते. रसिकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या ‘भावसरगम’ या कार्यक्रमाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पं. मंगेशकर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, आयोजक शिरीष रायरीकर उपस्थित होते.पं. मंगेशकर म्हणाले, ‘‘गाणे इतक्याच वेळेत संपले पाहिजे, हा विचार मनात बांधून अनेक गायक गातात. मी असे बांधून घेऊन कधी गायलो नाही. रंगमंचावर स्वत:ला सोडतो आणि मीच माझ्यात विसर्जित होत जातो.’’एखादा कार्यक्रम पन्नास वर्षे सतत करीत राहणे हे अवघड काम आहे. त्यासाठी प्रचंड प्रवास केला. सुरुवातीला ट्रकमधून जावे लागायचे. गेलो. अशा अनेक कष्टांतून हा कार्यक्रम उभा राहिला आहे, अशा शब्दांत त्यांनी कार्यक्रमाच्या आठवणी जागविल्या. दरम्यान, ‘हा खेळ सावल्यांचा,’ ‘तू तेव्हा तशी,’ ‘जयदेव जयदेव जय जय शिवराया,’ ‘शूर आम्ही सरदार,’ ‘म्यानातून उसळे तलवारीची पात,’ ‘सागरा प्राण तळमळला...’ अशी विविध गीते या वेळी नव्या पिढीतील गायकांनी सादर केली.राधा मंगेशकर आणि अरुण नूलकर यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
गायकाने स्वत:ला बांधून घेऊ नये : हृदयनाथ मंगेशकर
By admin | Updated: January 24, 2017 02:32 IST