पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) लोहगाव विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी हिंजवडी येथून सुरू केलेल्या ‘एसी बस’सेवेला अल्प प्रतिसाद मिळत आहे. प्रतिसादाअभावी कोथरूड ते विमानतळ ही बससेवा तीन महिन्यांपूर्वीच बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या दहापैकी जवळपास निम्म्या एसी बस धूळ खात उभ्या आहेत. ‘पीएमपी’ प्रशासनाने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात कोथरूड व हिंजवडी येथून एसी बससेवा सुरू केली. त्या वेळी एकूण १० एसी बस ताफ्यात दाखल झाल्या होत्या. त्यापैकी प्रत्येकी तीन बस हिंजवडी व कोथरूड मार्गासाठी देण्यात आल्या होत्या. तर, उर्वरित चार बसचा उपयोग पुणे दर्शनसाठी केला जाणार होता. कंपनीतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने जुलै महिन्यापर्यंत कोथरूड ते विमानतळ ही सेवा सुरू ठेवली होती. या मार्गावर प्रवाशांकडून खूपच कमी प्रतिसाद मिळाला. एकूण जागेच्या ५ टक्केही प्रवासी या बसमधून प्रवास करीत नव्हते. त्यामुळे या मार्गावरील सेवा जुलै महिन्यात बंद करावी लागली. हिंजवडी ते विमानतळ या मार्गावर तुलनेने चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, पीएमपीने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार प्रवासी मिळत नाहीत. एकूण जागेच्या ६० टक्के प्रवाशांकडून या बसचा वापर केला जातो. सध्या या मार्गावर दररोज आठ फेऱ्या होत आहेत. या मार्गावर चार बस धावत आहेत. सध्या सिझन नसल्याने पुणे दर्शनसेवेलाही तितकासा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे एक-दोन बसच उपयोगात येत आहेत. परिणामी, चार ते पाच एसी बस दररोज जागेवर उभ्या असतात. या बस ताब्यात घेण्याबाबत पीएमपी प्रशासनाला विनंती केल्याचेही संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
पीएमपीच्या एसी सेवेला अल्प प्रतिसाद
By admin | Updated: November 16, 2016 03:29 IST