पुणे : बनावट कंपन्या आणि बनावट खाती उघडून बनावट कागदपत्रांद्वारे राज्यातील विविध बँकांना वाहनकर्जाच्या माध्यमातून गंडा घालणाऱ्यांना गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने जेरबंद केले आहे. या ठगांनी बँकांना तब्बल एक कोटीला गंडा घातला असून पोलिसांनी दहा गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती उपायुक्त पी. आर. पाटील व सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी दिली. सचिन भरत तिवडे (वय ३२, रा. पिंपळे निलख), रवी रामचंद्र झनके (वय ४७, रा. पिंपळे गुरव), मोझेस विल्यम मदनकर (वय ३७, रा. कोंढवा) आणि अमित प्रकाश त्रिभवन (वय ३६, रा. कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आतापर्यंत पुणे, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, पनवेल, बारामती, मंचर, चाकण, सासवड व शिरूर येथील बँकांची फसवणूक केल्याचे समोर आलेआहे. चार कर्जप्रकरणांतून त्यांनी आतापर्यंत ९८ लाख रुपये त्यांनी उकळले आहेत. तर, इतर सहा प्रकरणे प्रलंबित आहेत. यामधून त्यांनी सव्वादोन कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली आहे.पथकाचे सहायक फौजदार संभाजी भोईटे यांना खबऱ्याने बनावट शिक्के व बनावट कागदपत्रांद्वारे बँकांना गंडवणारी टोळी शहरात कार्यरत असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक नितीन भोसले-पाटील, सहायक निरीक्षक धनजंय कापरे, उपनिरीक्षक दिनेश पाटील, कर्मचारी शशिकांत शिंदे, संभाजी भोईटे, रवींद्र कदम, रिजवान जिनेडी, प्रकाश लोखंडे, महेबूब मोकाशी, उमेश काटे, श्रीकांत वाघवले, इरफान मोमीन, तुषार खडके, सुधाकर माने, सुभाष पिंगळे, अशोक माने, प्रशांत गायकवाड, मोहन येलपले यांच्या पथकाने येरवडा परिसरात सापळा रचून चौघांना जेरबंद केले. (प्रतिनिधी)
बॅँकांना ठकवणारा गजाआड
By admin | Updated: February 14, 2017 02:17 IST