पुणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर करीत युती तुटल्याची घोषणा केल्यानिमित्त शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी डेक्कन येथील पक्षकार्यालयावर जमून जल्लोष केला. जोरदार घोषणाबाजी करीत, फटाके फोडून त्यांनी आनंद साजरा केला. शिवसेना पक्ष कार्यालयामध्ये या वेळी शहरप्रमुख विनायक निम्हण, माजी आमदार महादेव बाबर, श्याम देशपांडे, सचिन तावरे, सुनील टिंगरे उपस्थित होते. या वेळी कार्यकर्त्यांनी युती तुटल्याने आता आम्हाला संधी मिळेल, अशी भावना व्यक्त केली. आजपर्यंत इतरांचा झेंडा हातात घेऊन काम करावे लागत होते. शहरातील पक्षाची वाढ खुंटली होती, असेही कार्यकर्त्यांनी सांगितले. याबाबत बोलताना शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख विनायक निम्हण म्हणाले, ‘‘पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कार्यकर्त्यांच्या आणि महाराष्ट्रातील जनतेच्या मनातला निर्णय घेतला आहे. त्याचे सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे कपटी अपराध पोटात घालून युतीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले परंतु यश आले नाही, यात शिवसेनेचा दोष नाही. युती तोडण्याचा निर्णय सर्व जनतेला हवा वाटणारा निर्णय असल्याचे महादेव बाबर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
शिवसेनेचा जल्लोष
By admin | Updated: January 28, 2017 02:03 IST