ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १० - स्वांत्र्यवीर सावरकर यांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून अंदमान येथे होणा-या चौथ्या विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोरे यांची निवड करण्यात आली आहे. ५ व ६ सप्टेंबर रोजी अंदमान येथे चौथे साहित्य संमेलन पार पडेल असे साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांनी सांगितले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याचे अभ्यासक असणा-या मोरे यांनी सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरग, काँग्रेस व गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?, सावरकरांचा बुद्धिवाद व हिंदुत्ववाद अशी अनेक पुस्तके लिहीली आहेत.
या संमेलनाला निधी देण्यास शासनाने दिलेला नकार, कॅनडाचे संमेलन रद्द करण्याची ओढावलेली नामुष्की, दक्षिण आफ्रिकेकडून आलेला प्रस्ताव, आर्थिक सहकार्याशिवाय आयोजकांची संमेलन घेण्याची असमर्थता असा इतिहास असताना हे संमेलन होणार, की नाही? याबाबत साहित्य वर्तुळात उत्सुकता होती. मात्र हे संमेलन घेण्यावर महामंडळाने शिक्कामोर्तब करत ते अंदमान घेण्यात येणार असल्याची घोषणा गेल्या आठवड्यात केली. पोर्टब्लेअर येथील महाराष्ट्र मंडळ आणि आॅफबीट डेस्टिनेशन या संस्थेच्या वतीने हे संमेलन सप्टेंबर महिन्यात होणार आहे.