पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी डिसेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल मार्च अखेरील जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील परीक्षा जून अखेरीस आयोजित करण्याच्या हालचाली विद्यापीठाने सुरू केल्या आहेत. मात्र, कोरोना काळात ऑनलाईन परीक्षा घेणे सुरक्षित असले तरी परीक्षेच्या तयारीसाठी उपलब्ध असणारा कालावधी कमी असल्याने सेट परीक्षा ऑफलाइन पध्दतीनेच घेतली जाणार असल्याचे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे सेट परीक्षेचे तर नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) माध्यमातून नेट परीक्षा घेतली जाते. गेल्या काही वर्षांपासून नेट परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेतली जात आहे. मात्र, पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा ‘ओएमआर’ शीट वर ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जात आहेत. कोरोना काळात सुरक्षेमुळे सर्व परीक्षा ऑनलाईन पध्दतीने आयोजित केल्या जात आहेत. त्यामुळे सेट परीक्षा सुध्दा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल का? अशी शंका विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाली.
दोन राज्यांतील विविध शहरांमध्ये सेट परीक्षा घेण्यासाठी आवश्यक असणारे अत्याधुनिक परीक्षा केंद्र आणि परीक्षेच्या आयोजनासाठी लागणारे तंत्रज्ञान विद्यापीठाकडे उपलब्ध नाही. तसेच ऑनलाइन परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्नसंच तयार नाहीत. त्याचप्रमाणे ही सर्व तयारी करण्यासाठी विद्यापीठाकडे पुरेसा कालावधी नाही. त्यामुळे येत्या जून महिन्यात होणारी सेट परीक्षा ऑफलाइन पध्दतीने ‘ओएमआर’ शीट वरच होणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी याच दृष्टीने करावी, असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
--
ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करावे लागणार
विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे डिसेंबर २०२० मध्ये सेट परीक्षा घेतली. त्यात एसईबीसीमधून अर्ज भरलेल्या सुमारे दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी त्यांचा ईडब्ल्यूएस आरक्षणात समावेश करून निकाल जाहीर करावा, असे विद्यापीठाला कळवले आहे. परिणामी या विद्यार्थ्यांना निकाल जाहीर झाल्यानंतर ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र काढून ठेवावे, असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.