कोरोना लशीसाठी ‘सिरम’चे ‘इंडिया फर्स्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 04:05 AM2020-11-29T04:05:29+5:302020-11-29T04:05:29+5:30

लोकमत न्युज नेटवर्क पुणे : कोरोना लस वितरणासाठी ‘सिरम’चे प्राधान्य भारतालाच असेल. त्यानंतर आफ्रिकी देशांना लस दिली जाईल, असे ...

Serum's India First for Corona Vaccine | कोरोना लशीसाठी ‘सिरम’चे ‘इंडिया फर्स्ट’

कोरोना लशीसाठी ‘सिरम’चे ‘इंडिया फर्स्ट’

Next

लोकमत न्युज नेटवर्क

पुणे : कोरोना लस वितरणासाठी ‘सिरम’चे प्राधान्य भारतालाच असेल. त्यानंतर आफ्रिकी देशांना लस दिली जाईल, असे सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी शनिवारी (दि. २८) स्पष्ट केले. युरोप-इंग्लंडसाठी लस पुरवण्याचा मुद्दा आमच्यापुढे नाही. आवश्यकता पडलीच तर भविष्यात त्याचा विचार करता येईल, असे त्यांनी सांगितले.

इंग्लंडमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अँस्ट्राझेन्का यांच्यातर्फे विकसित केल्या जाणाऱ्या कोरोनावरील कोविशिल्ड लसीचे उत्पादन ‘सिरम’मध्ये सुरु झालेे आहे. त्याची पाहणी करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिरमला भेट दिली. त्यानंतर अदर पुनावाला यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पुनावाला म्हणाले की भारतातील कोरोना लस वितरणासंदर्भात अद्याप केंद्र सरकारने कोणतीही लेखी मागणी नोंदवलेली नाही. मात्र जुलै २०२१ पर्यंत ३० ते ४० कोटी डोस लागणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. आम्ही सध्या दरमहा ५ ते ६ कोटी डोस तयार करत आहोत. येत्या जानेवारीपासून दरमहा १० कोटी डोसचे उत्पादन केले जाईल.

पंतप्रधानांनी लसीची उत्पादन प्रक्रिया, सर्व लसींचे फायदे-तोटे, मर्यादा, किंमती आणि कोविशिल्डच्या प्रत्यक्ष वापराच्या नियोजनावर चर्चा केली. आरोग्य मंत्रालयाला पुढील वर्षीच्या पहिल्या टप्प्यात १० कोटी डोस हवे आहेत, असे पुनावाला म्हणाले. पंतप्रधान मोदी यांचे सीरम येथे आगमन झाल्यानंतर अध्यक्ष डॉ. सायरस पुनावाला यांनी त्यांचे स्वागत केले. आदर आणि नताशा पुनावाला यावेळी उपस्थित होते.

चौकट

शंका, अस्वस्थता नकोच

“भारतानंतर मुख्यत: ‘कोव्हॅक्स’अंतर्गत येणाऱ्या आफ्रिकी देशांना लस दिली जाईल. होईल. अ‍ॅस्ट्रॉझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून ब्रिटन आणि युरोपातील देशांना लस पुरवठ्याचे नियोजन केले जाणार आहे. स्वस्त दरात आणि मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध व्हावी, यासाठी संपुर्ण जग भारताकडे डोळे लावून बसले आहे. जगाला लागणाऱ्या एकुण लसींपैकी ५० ते ६० टक्के लसी भारतात तयार होतात. ‘आत्मनिर्भर भारत’ हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन आम्ही मोठ्या प्रमाणावर उत्पादनाची तयारी ठेवली आहे. जगभरातून लसींच्या क्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र प्रत्यक्ष स्थिती जाणून न घेता सामान्यांमध्ये अस्वस्थता निर्माण करू नये. सध्याच्या परिस्थितीत लोकांच्या मनात विनाकारण शंका निर्माण होणे योग्य नाही.”

-आदर पुनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी सीरम इन्स्टिट्यूट

चौकट

आपत्कालीन वापरासाठी डोस तयार

आपत्कलानी परिस्थितीत लस वापरण्याची मंजुरी मागण्यासाठी येत्या दोन आठवड्यात औषध महानियंत्रकांकडे प्रस्ताव देणार आहे. आम्हाला ‘शॉर्टकट’ नको आहे, असे अदर पुनावाला यांनी सांगितले. लशीची परिणामकारकता जोखण्यासाठी आतापर्यंत झालेल्या चाचण्या पुरेशा आहेत, असा दावा त्यांनी केला. त्यामुळेच आता १८ वर्षांच्या खालील व्यक्तींवरही आता आम्ही चाचणी घेऊ शकतो, असे ते म्हणाले.

Web Title: Serum's India First for Corona Vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.