कोरेगाव भीमा : डिंग्रजवाडी-कोरेगाव भीमा परिसरात बिबट्याने दोन दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. कोरेगाव भीमात पोलीसपाटील मालन गव्हाणे यांच्या शेतातील धनगरांची घोडी बिबट्याने फस्त केली, तर २ कुत्र्यांना पळवून नेले. डिंग्रजवाडी येथील एकनाथ हरगुडे यांच्या गोठ्यातील शेळी बिबट्याने मारून उसाच्या फडात ओढत नेल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना सांगूनही कोणतीच खबरदारी अद्याप घेण्यात आलेली नाही.कोरेगाव भीमा-वढू बुद्रुक, आपटी, डिंग्रजवाडी परिसरात दोन महिन्यांपासून नर-मादी बिबट्या व दोन पिले नागरिकांना सतत निदर्शनास येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वढू बुद्रुक येथे वन विभागाने पिंजरा लावूनही बिबट्या पिंजऱ्यात अडकत नसल्याने बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने गांभीर्याने दखल घेण्याची मागणी नागरिक करीत आहेत. कामगारांना रात्री कामाहून घरी जातानाही अनेकदा बिबट्या रस्त्यात पाहण्यास मिळत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. बिबट्याने हिंस्र रूप घेतल्यास नागरिकांच्या जिवावरही बेतू शकते. त्यामुळे वन विभागाने बिबट्या व पिलांना पकडण्यासाठी ठोस उपाययोजना आखण्याची मागणी दोन महिन्यांपासून करूनही ठोस कार्यवाही होत नाही.पहाटे डिंग्रजवाडी येथील एकनाथ हरगुडे यांच्या गोठ्यातील शेळीचा बिबट्याने फडशा पाडून उसाच्या फडात ओढत नेले. कुत्रीही मारली. शुक्रवारी पहाटे कोरेगाव भीमाच्या पोलीसपाटील मालन गव्हाणे यांच्या शेतात बसलेल्या धनगराच्या वाड्यातील घोडीचा फडशा पाडला, तर दोन कुत्र्यांचा फडशा पाडून पळवून नेले. वनसंरक्षक सोनाली राठोड यांनी बिबट्या दिसल्यानंतर परिसरात फटाके वाजविण्याचे आवाहन केले आहे.
कोरेगाव भीमात बिबट्याचा धुमाकूळ
By admin | Updated: January 28, 2017 00:09 IST