पुणे : संत ज्ञानेश्वरमहाराज व संत तुकाराममहाराज यांचा पालखी सोहळा पुण्यनगरीतील दोन दिवसांचा मुक्काम आटोपून रविवारी पंढरीकडे प्रस्थान करीत आहे. तुकोबांचा पालखी सोहळा लोणी काळभोर येथे, तर माऊलींचा पालखी सोहळा दिवे घाटमार्गे सासवड येथे मुक्कामाला येत आहे. प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे. सासवड : श्री संत ज्ञानराज माऊलींचा पालखी सोहळा लाखो वैष्णवांसह आज (रविवार) श्री संत सोपानकाकांच्या सासवड नगरीत दोन दिवसांच्या मुक्कामासाठी दाखल होत असून, पालखीच्या वास्तव्याकरिता परंपरेनुसार शितोळे सरकारांचा तंबू उभारून सज्ज झाला आहे. आळंदी ते पंढरपूर या मार्गावरील तंबूत असणारा हा पहिला मुक्काम असून, याविषयी हेमंत निखळ यांनी विशेष माहिती दिली. अंकली (बेळगाव) च्या ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या घराण्यात सुमारे २०० वर्षांपासून पालखीच्या तंबूचा त्याचप्रमाणे माऊलींच्या अश्वाचा मान असून, ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याकडून हा मान त्यांचाकडे आल्याचे निखळ यांनी सांगितले. आषाढ वारीत माऊलींसाठी रोजच्या पहाटेच्या नैवेद्याचा मानदेखील शितोळे सरकारांचा असून, हा नैवेद्य फक्त पुरणपोळीचाच असतो. तळावर उभारण्यात आलेल्या अष्टकोनी आकाराच्या तंबूची लांबी २८ फूट, रुंदी १८ फूट, तर उंची १४ फूट असून, तो पूर्णत: पाणी व अग्निविरोधक आहे. तंबूमध्ये एका सीसीटीव्ही कॅमेरासह विद्युत व्यवस्था आहे. तंबू उभारणीसाठी कोणत्याही स्वरूपाचे नटबोल्ट वापरले आहे. हा तंबू केवळ अर्ध्या तासात उभारता तसेच काढता येतो, असेही निखळ यांनी सांगितले. लोणी काळभोर : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा रविवारी लोणी काळभोरला मुक्कामी येत आहे. ग्रामपंचायतीने सर्व सुविधा सज्ज केल्या आहेत. नागरिकांनी पालखी सोहळ्याच्या स्वागताची तयारी पूर्ण केली आहे. (वार्ताहर)
सासवड, लोणी काळभोर सज्ज
By admin | Updated: July 12, 2015 00:10 IST