पुणे : ससूनच्या वॉर्ड क्रमांक २३ व २४ मध्ये झालेली गर्दी कमी करण्यासाठी गेलेल्या सुरक्षारक्षकाला मारहाण करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजेश चव्हाण याच्यासह टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश जाधव (वय २३, रा. कानगाव, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. जाधव आणि त्यांचा मित्र पवन सुरेश मुसळे हे रात्रपाळीला होते. हे दोघेही जेवण करण्यासाठी जात असताना त्यांना सुपरवायझर चंद्रकांत गायकवाड यांनी वॉर्ड क्रमांक २३ व २४ समोर गर्दी झाल्याचे सांगितले. त्यानुसार जाधव व मुसळे तेथे जाऊन गर्दी कमी करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी चव्हाण याला त्यांनी तेथून जायला सांगितले असता त्याने कपडे विकणारी महिला नवले हिचा भाऊ असून मला ओळखत नाही का असे म्हणून आत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांनी त्याला अडवत जमादार कार्यालयात नेले. तेव्हा चव्हाण आणि जमावातील लोकांनी जाधव, मुसळे आणि जोसेफ रतन जाधव या तिघांना शिवीगाळ करीत मारहाण केली. या तिघांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)
ससूनच्या सुरक्षारक्षकाला मारहाण
By admin | Updated: February 21, 2016 03:06 IST