पुणे : एकमेकांवर झडणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैैरींनी यंदाचेही मराठी साहित्य संमेलन ढवळून निघणार अशी चिन्हे दिसत असून उमेदवारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. विशिष्ट उमेदवाराला मिळणारे पाठिंबे, ‘प्रवीण’च्या निवडीसाठी बिल्डरकडून एका जाहीर कार्यक्रमाात दाखवण्यात येणारे २ कोटींचे आमिष, यावरच आक्षेप घेत साहित्य वर्तळात चाललेले हे घृणास्पद खेळ थांबले पाहिजेत, अशा शब्दांत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. जयप्रकाश घुमटकर यांनी टिकास्त्र सोडले. ‘लक्ष्मीच्या तालावर सरस्वतीच्या वीणेची तार छेडणार का?’, असा सवाल विचारत, ‘सारस्वताच्या दरबारामध्ये चाललेले हे घृणास्पद खेळ त्वरित थांबावेत’, अशी मागणीही त्यांनी केली. साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण आता नित्याचे झाले आहे. यंदाचे डोंबिवली येथे आयोजित करण्यात आलेले ९०वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही त्याला अपवाद ठरलेले नाही. यंदा डॉ. अक्षयकुमार काळे, प्रवीण दवणे, मदन कुळकर्णी आणि डॉ. जयप्रकाश घुमटकर ही नावे संमेलनाध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच डॉ. अक्षयकुमार काळे यांना सर्व साहित्यिकांनी जाहीर पाठिंबा दर्शवला होता. दुसरीकडे, डोंबिवलीमध्ये एका बिल्डरने ‘प्रवीण’ निवडून आल्यास आयोजकांना दोन कोटी रुपये देण्याचे आमिष दाखवले. या घटनांचा घुमटकर यांनी पत्रकार परिषदेत खरपूस समाचार घेतला. साहित्य महामंडळालाही त्यांनी टिकेचे लक्ष्य बनवले. घृणास्पद प्रकार थांबवण्याबाबत साहित्य महा-मंडळाकडे तक्रार करुनही महामंडळाने कोणतीच दखल घेतली नसल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
लक्ष्मीच्या तालावर सरस्वतीची वीणा?
By admin | Updated: November 16, 2016 02:14 IST