पुणे : महिलेच्या घरामध्ये घुसून तिच्या १३ दिवसांच्या मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन तलवारीच्या धाकाने ३ हजार रुपये चोरून नेणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली आहे. या सराईतावर खून, खुनाचा प्रयत्न, दंगे, बेकायदा हत्यार बाळगणे असे तब्बल १४ गुन्हे दाखल आहेत. मुजम्मील ऊर्फ मुर्ग्या शब्बीर मोकाशी (वय ३२, रा. ३२६, घोरपडे पेठ) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आरती महादेव मिसाळ (वय २५, रा. इनामकेमळा, लोहियानगर, घोरपडे पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. मुर्ग्या याने १६ जुलै रोजी हातामध्ये तलवार घेऊन मिसाळ यांच्या घरात घुसून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यांच्या मानेवर तलवार ठेवून १३ दिवसांच्या बाळाला ठार मारण्याची धमकी देत त्याने पाच हजारांची मागणी करीत घरातील तीन हजार रुपये जबरदस्तीने नेले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांना त्यांच्या खबऱ्याने आरोपीची माहिती दिली. त्यानुसार पत्नीला भेटायला अरण्येश्वरजवळील अण्णा भाऊ साठे वसाहतीमध्ये आलेल्या आरोपीला पोलिसांनी सापळा रचून पकडले. त्याच्यावर मेहबूब करीम शेख (रा. औद्योगिक वसाहत, गुलटेकडी) यांनाही साथीदारांसह मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे. मुर्ग्या हा सराईत गुंड असून, त्याने साथीदारांसह मिळून २०१३ मध्ये ॠषीकांत दरेकर (रा. मंगळवार पेठ) यांचा खून केला होता. ही कारवाई उपायुक्त तुषार दोषी, सहायक आयुक्त प्रवीण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विवेक मुगळीकर यांच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)
सराईत गुंडाला खंडणीप्रकरणी अटक
By admin | Updated: September 15, 2015 04:15 IST