लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आजकाल चित्रपटातील गाणी सतत गायली जातात. परंतु, हे दीर्घकाळ टिकण्यासारखे नाही. लोकशाहीर रामजोशी यांच्यासारख्या शाहिरांची परंपरा टिकविली, तर पुढील पिढीवर चांगले संस्कार होतील. वाड्.मयातील हे पोवाडे आपण मुलांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजीमहाराज कोण, हे विचारण्याची वेळ पुढील पिढीवर येऊ नये, यासाठी शाहिरी परंपरा सांभाळायला हवी, असे प्रतिपादन ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ विश्वास मेहेंदळे यांनी व्यक्त केले. शनिवार पेठेतील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी व डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे ज्येष्ठ शाहीर अंबादास तावरे यांचा एकाहत्तरीनिमित्त विशेष सन्मान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी कमल तावरे, ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, शाहीर हेमंतराजे मावळे उपस्थित होते. या वेळी ‘निरंतर विनामूल्य पोवाडा प्रशिक्षण वर्ग व शाहीर आपल्या भेटीला’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. मेहेंदळे म्हणाले, ‘आपण आपल्या मुलांना खरे बोलायला शिकवतो; पण अनेकदा त्यांच्यासमोरच आपण खोटे बोलतो. चांगल्या गोष्टींची सुरूवात नेहमी आपल्या घरापासूनच होते, हे पालकांनी लक्षात ठेवून त्यादृष्टीने मुलांवर संस्कार केले पाहिजेत. ‘बलसागर भारत होवो’ हे साने गुरुजींचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाही. ते पूर्ण करण्यासाठी चांगल्या पद्धतीने काम करायला हवे’, असेही ते म्हणाले. दर शनिवारी सायंकाळी ७ ते ८ या वेळेत रमणबग प्रशालेत पोवाडा वर्ग विनामूल्य सुरू राहणार आहे. उत्तरार्धात अंबादास तावरे यांची मुलाखत प्रभाकर ओव्हाळ यांनी घेतली. युवा शाहीर मनाली क्षीरसागर हिने पोवाडा सादर केला. प्रा. संगीता मावळे यांनी सूत्रसंचालन केले. गणेश टोकेकर यांनी आभार मानले.शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, शाहिरी हे लोकसंगीत असून, लोकांसाठी निर्माण झाले आहे. या माध्यमातून जनतेच्या अनेक समस्या, प्रश्न शाहीर समाजासमोर, शासनासमोर मांडतात. लोककलेची ही परंपरा टिकावी, शाहिरीचा प्रसार व्हावा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत ही कला पोहोचून ती जिवंत राहावी, यासाठी निरंतर पोवाडा प्रशिक्षणवर्गाची सुरुवात केली आहे.
शाहिरीतून पुढील पिढ्यांवर संस्कार
By admin | Updated: July 3, 2017 03:37 IST