लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर : येथील एका किराणा दुकानामध्ये विनापरवाना देशी-विदेशी दारू विक्री होत असल्याचा प्रकार गुन्हे शाखेच्या कारवाईनंतर उघडकीस आला आहे. पोलिसांनी दुकानावर धाड टाकत १५ हजार १७२ रुपये किमतीच्या १७२ देशी विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
अनिल तिलकचंद देसर्डा (वय ६१, रा. खोकलाई चौक, लोणी काळभोर, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. व्हि. महानोर यांना खोकलाई चौक, लोणी काळभोर येथे अजय किराणा दुकानामध्ये दुकानचालक अनिल देसर्डा हा देशी विदेशी दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांना सांगितली. त्यांनी या दुकानावर छापा टाकून कारवाईच्या सूचना दिल्या. गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक महानोर, पोलीस हवालदार रोहीदास पारखे, नितीन गायकवाड, विजय गाले, मारूती बाराते व प्रियांका धावडे यांनी रविवारी (दि ७) सायंकाळी ७.३० च्या सुमारास धाड टाकत देसार्डा याला रंगेहात पडकले. दुकानाची झडती घेतली असता काऊंटरचे खाली व फ्रिजमध्ये १५ हजार १७२ रुपयांच्या १७२ मद्याच्या बाटल्या मिळून आल्या. त्या जप्त करण्यात आल्या आहेत.