पुणे : मांस, औषधासाठी, विविध वस्तू तयार करण्यासाठी खवले मांजराचा वापर होतो. म्हणून त्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर केली जाते. हा प्राणी दुर्मीळ झाला असून, त्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्याचे संवर्धन करणे आवश्यक असल्याने राज्य सरकारने नुकतीच एक कृती समिती स्थापन केली. ही समिती संवर्धनाचा आराखडा तयार करत असून, पुढील महिन्यात तो सरकारकडे सादर होणार आहे. त्यामुळे यातून तरी खवले मांजरांना सुरक्षा मिळेल, अशी आशा आहे.
वन्यजीव संरक्षण अधिनियमाअंतर्गत ही प्रजाती अनुसूची १ मध्ये समाविष्ट आहे. तरीही त्याची शिकार होऊन खवले विकले जात आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी व संवर्धनासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी तज्ज्ञांचा अभ्यासगट नेमला आहे. या अभ्यासगट समितीमध्ये पुण्याचे वनसंरक्षक रमेश कुमार हे अध्यक्ष आहेत.
खवले मांजरावर कुऱ्हाड जरी घातली तरी त्याला काहीच होत नाही. त्यामुळे याला उकळत्या पाण्यात टाकून त्याचे खवले काढले जातात. नागरिकांनी तस्करी होत असेल, तर वन विभाग, पोलिसांना कळवावे.
————————
कॅमेरा ट्रॅपद्वारे अभ्यास
सह्याद्री निसर्गमित्र संस्थेच्या माध्यमातून गेली चार वर्षे कोकणात ४० कॅमेरा ट्रॅप लावून खवले मांजराचा अभ्यास होत आहे. भाऊ काटदरे यांची संस्था असून, त्यांचाही कृती आराखडा समितीमध्ये समावेश आहे.
————————-
खवले मांजराचे मांस अनेक जमाती खातात. त्यामुळे त्यांचा अधिवास कमी होत आहे. हा प्राणी वाळवंटात, कमी झाडी आणि दाट जंगलातही राहतो. मुंग्या, वाळवी हे तो खातो. आम्ही २५ वर्षांपूर्वी पुणे परिसरात सर्वेक्षण केले होते. तेव्हा सिंहगड, कात्रज परिसरात आम्हाला खवले मांजर दिसले होते. हा प्राणी रात्री बिळातून बाहेर पडतो. चिनी लोक याचा औषधासाठी वापरतात. तसेच अंगठी, ब्रेसलेट, जॅकेटमध्येही वापरल्याने त्याला चीनमध्ये मागणी आहे. ईशान्य भारताकडे अधिक तस्करी होते. खरंतर हा प्राणी दुर्मीळ होत असून, त्याचे संवर्धन करायला हवे.
- डॅा. संजीव नलावडे, वन्यजीव संशोधक
———————
संवर्धनाच्या कृती आराखड्यात या प्रजातीचे अस्तित्व, त्याला कोणते धोके आहेत, तस्करी कोठे आणि कशी होते, खवले मांजराला वाचविण्यासाठी उपाययोजना कोणत्या करता येतील, या बाबींवर हा अहवाल तयार होत आहे. तो पुढील महिन्यात सरकारला देण्यात येईल.
- रमेश कुमार, वनसंरक्षक (वन्यजीव, पुणे)
————————