पुणे : तळेगाव दाभाडे येथील रामनाथ पंडित संशोधन केंद्राचे मुख्य विश्वस्त श्रीराम कृष्ण ऊर्फ एस. के. पंडित (वय ८८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
पंडित यांच्या संशोधन केंद्रामध्ये सुमारे अडीच लाख ग्रंथ, २० हजार ध्वनिमुद्रिका आणि दुर्मीळ वस्तू असा अत्यंत मौल्यवान संग्रह आहे. मराठी संगीत नाटकांचा जवळ जवळ संपूर्ण ठेवा त्यांनी जतन केला असून बालगंधर्व यांचा ऑर्गन आणि पद्मभूषण पदकासह अनेक वस्तू त्यांच्या संग्रहात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिफारसीनुसार दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीने या केंद्रास दत्तक घेतले आहे.
पंडित इलेक्ट्रॉनिक इंजीनियर म्हणून १९५५ पासून हवाई दलात नोकरीस होते. १९६२ पासून ९३ पर्यंत ते टाटा मूलभूत संशोधन केंद्रात ते सेवारत होते. याच काळात त्यांनी छंद म्हणून नाटकाची पुस्तके, ध्वनिमुद्रिकांचा संग्रह करायला सुरुवात केली होती.