नारायणगाव : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोचालकास मारहाण करून त्याच्या खिशातील रोख रक्कम दोन हजार रुपये लुटून नेणाऱ्या चार जणांच्या टोळीला अवघ्या अर्ध्या तासात पकडण्यात नारायणगाव पोलिसांना यश मिळाले़ पकडलेल्या टोळीमध्ये दोन जण अल्पवयीन मुले असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक टी़ वाय़ मुजावर यांनी सांगितले.निशांत विश्वनाथ पवार (वय १६), आकाश लक्ष्मण भिसे (वय १६), किरण दत्तात्रय भालेराव (वय २२), अमित बबन साळवे (वय १९, सर्व रा़ कांदळी, जुन्नर) या चौघांना ताब्यात घेतले आहे. टेम्पोचालक कलेक्टर मुन्नीलाल सिंह (वय २५, रा़ राठवणपूरा उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे़.गुजरात येथून माल घेऊन टेम्पो पुणे येथे गेला होता. तेथून पुन्हा गुजरातकडे जात असताना गाडीतील माल खाली करून ते पहाटे सितारा ढाब्यासमोरील नवीन पुलावर रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून झोपले होते़ या वेळी वरील चौघांनी गाडीची काच फोडली व कलेक्टर सिंह यांना मारहाण करीत पैशांची मागणी केली. पैसे नसल्याचे सांगितल्याने चौघांनी त्यास मारहाण केली़ खिशातील दोन हजार रुपये काढून घेऊन पसार झाले़ या घटनेची खबर नारायणगाव पोलिसांना देताच कांदळी परिसरातच गस्तीवर असलेल्या पोलिसांनी या चौघांचा पाठलाग करून अवघ्या अर्ध्या तासातच चौघांना ताब्यात घेतले़ या चौघांपैकी अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात रवाना करण्यात आले आहे. किरण भालेराव याला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे़, तर अमित साळवे हा जखमी झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत़. (वार्ताहर)
मारहाण करून टेम्पोचालकास लुटले
By admin | Updated: March 24, 2017 03:49 IST