लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आरोग्यसेवक, पोलीस यांच्याप्रमाणेच रोज प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा व्यावसायिकही ‘फ्रंट लाइन’ कोरोना योद्धेच आहेत, त्यांनाही प्राधान्याने कोरोना लस द्यावी, अशी मागणी होत आहे.
एका रिक्षाचालकाचा रोज किमान शंभर वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर संपर्क येतो. प्रवासी रिक्षात त्यांच्याबरोबर तास-अर्धा तास तरी असतो. त्याशिवाय मीटरभाडे घेतानाही संपर्क येतो. अशा स्थितीत कोरोना प्रादुर्भाव होण्याची, तो वाढण्याची शक्यता असल्याचे साथ रोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बहुतांश रिक्षाचालक सर्वसाधारण वसाहतींमध्ये राहात असल्याने ते ‘सुपर स्प्रेडर’ होऊ शकतात. कोरोनाकाळात सरकारी अत्यावश्यक कामांसाठी अनेकांनी रिक्षा चालवली. या सर्वांचा विचार करून सरकारने त्यांना कोरोना फ्रंट लाइन योद्धा जाहीर करावे, त्यांना प्राधान्याने लस द्यावी असे रिक्षा संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे.
कोरोना काळात राज्यातील १० लाख रिक्षा व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला. सलग सहा महिने रिक्षा बंद असल्याने रिक्षाचालकांची आर्थिककोंडी झाली आहे. त्यामुळे त्यांना ही लस प्राधान्याने तर द्यावीच शिवाय विनामूल्य द्यावी अशी मागणी आहे. साथ रोग तज्ज्ञ डॉ. अच्युत जोशी म्हणाले की, सरकारने याचा नक्कीच विचार करावा. दिवसभरात जास्त नागरिकांबरोबर संपर्क येणारा हा व्यवसाय आहे. प्रवाशांकडून रिक्षाचालकाला अथवा चालकाकडून प्रवाशाला संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रिक्षाचालकांंना लस प्राधान्याने द्यावी.
चौकट
आम्ही यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. आमदारांचे वेतन पूर्ववत करणारे व आमदार विकासनिधी वाढवून देणारे उपमुख्यमंत्री याकडे सहानुभूतीने पाहतील अशी अपेक्षा आहे.
-श्रीकांत आचार्य, सल्ल्लागार, आम आदमी रिक्षा संघटना.
चौकट
कोरोना काळात रिक्षा चालकांचे आर्थिक नुकसान झाल्याने सरकारने त्यांना विनामूल्य लस द्यायला हवी.-
नितीन पवार, सरचिटणीस, रिक्षा पंचायत