ओझर : ग्रामीण भागामध्ये औषधांच्या नशेचे लोण कसे वाढत आहे, हे ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून दाखवून दिल्यानंतर राज्यातील औषध प्रशासन खडबडून जागे झाले आहे. शहर व ग्रामीण भागात छापासत्र सुरू करण्यात आले असून, औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. पुणे जिल्ह्यातील तरुणाई बंदी घातलेल्या औषधांच्या नशेच्या आहारी गेल्याचे जळजळीत वास्तव ‘लोकमत’ने मांडले होते. त्या पार्श्वभूमीवर जुन्नर पोलीस ठाण्यात जमीर हुसेन शेख व जुनेद महंमद हुसेन मुजावर या दोन तरुणांवर गुन्हा दाखल झाला आहे. औषध निरीक्षक दिनेश खिंवसरा यांच्या फिर्यादीनुसार औषधे व सौंदर्यप्रसाधन कायदा १९४० अंतर्गत हे गुन्हे दाखल केले आहेत. या तरुणांकडून औषधांच्या बेकायदेशीर ४२ बाटल्या, गोळ्यांची ५१ पाकिटे अशी गुंगी आणणारी औषधे विक्री करताना पकडली आहेतनगर जिल्ह्यातही छापे घालण्यात आले असून, त्यात संगमनेर शहरातील संजीवन मेडिकल व जनरल स्टोअर व मनियार मेडिकल स्टोअर या औषधविक्रेत्यांच्या औषधविक्रीला बंदी घातली आहे. त्यांची अधिक चौकशी सुरू असल्याचे अहमदनगर जिल्ह्याचे सहायक आयुक्त पी. एन. कातकरे यांनी सांगितले.महाराष्ट्र राज्य रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष आशीष हांडे म्हणाले, की शासनाच्या तिहेरी कुलपातील बंदी असलेल्या या औषधांची तस्करी होऊन नशेसाठी या औषधांचा वापर होत आहे. त्यामुळे भावी तरुण पिढी अक्षरश: बरबाद होत आहे. औषध उत्पादन करणाऱ्या कंपन्या व किरकोळ विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांना जी कायदेशीर बंधने आहेत, तीच बंधने ठोक विक्रेत्यांना लागू केल्यास या औषधांच्या काळ्याबाजाराला पायबंद बसेल. (वार्ताहर)
औषधांच्या काळ्याबाजाराला बसतोय लगाम
By admin | Updated: October 31, 2015 01:16 IST