वालचंदनगर पोलीस ठाणे व शिव शंभू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जंक्शनमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी रांगा लावून रक्तदान केले. एकूण २८० नागरिकांनी यावेळी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक हेल्मेट, रक्तदान केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. वालचंदनगर पोलीस ठाण्यातील तीन अधिकारी, १९ अंमलदारांनी प्रतिसाद देऊन रक्तदान केले. ७ महिलांनीदेखील रक्तदान केले. यावेळी सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आले.
याप्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे, पोलीस उपनिरीक्षक अतुल खंदारे, नितीन लकडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक रतीलाल चौधर, शिव शंभू चॅरिटेबल ट्रस्टचे भूषण सुर्वे उपस्थित होते. अक्षय रक्तपेढीने रक्तसंकलन केले.
सहायक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे म्हणाले, रक्तदान जगातील सर्वांत श्रेष्ठ दान आहे. आज रक्ताची राज्याला गरज भासत आहे. त्यामुळे रक्तदान चळवळ निर्माण झाली पाहिजे. आज याठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला असून, प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे.