येरवडा : लोहगावमध्ये बुधवारी (दि. १२) रात्री २ गटांत झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील पोलीस बंदोबस्त शुक्रवारी (दि. १४) सलग तिसऱ्या दिवशीही कायम ठेवण्यात आला होता. लोहगावमध्ये गुरुवारी (दि. १३) बंद पाळण्यात आल्यानंतर शुक्रवारी बाजारपेठ सुरू असल्याने व पोलीस बंदोबस्तामुळे मागील २ दिवस तणावपूर्ण बनलेले वातावरण काही प्रमाणात सामान्य झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, आमदार जगदीश मुळीक यांनी गुरुवारी रात्री लोहगावला भेट दिल्यानंतर शुक्रवारी दोन्ही गटांमधील लोकप्रतिनीधींशी चर्चा करून त्यांच्यात यशस्वीपणे समेट घडवून आणला. याठिकाणी बुधवारी रात्री २ गटांत झालेल्या हाणामारीत अनेक जण किरकोळ जखमी होऊन २१ वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याप्रकरणी दोन्ही बाजूकडील तरुणांवर गुन्हे दाखल करून २० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वांना आज न्यायालयात हजर करण्यात आले नाही. तसेच या प्रकरणातील अनेक आरोपी फरार असून, पोलिसांची पथके त्यांचा ठिकठिकाणी शोध घेत आहेत. विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास सोंडे म्हणाले, की लोहगावमधील वातावरण शांत झाले आहे. मागील २ दिवस या परिसरात सुमारे २५० पोलिसांचा बंदोबस्त होता. येथील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार मुळीक यांनी लोहगावला भेट दिली व दोन्ही बाजूकडील लोकप्रतिनिधींशी वेगवेगळी चर्चा केली. या वेळी दोन्ही बाजूकडून हा वाद संपवण्याचे संकेत देण्यात आले. त्यानंतर मुळीक यांनी शुक्रवारी त्यांच्या रामवाडीतील कार्यालयात दोन्ही बाजूकडील नागरिकांची एकत्र बैठक घेतली. दोन्ही गटांत समेट घडल्याने शनिवारी (दि. १५) एकमेकांविरोधात दिलेल्या फिर्यादी मागे घेण्यात येणार आहेत.
लोहगावात परिस्थिती पूर्वपदावर
By admin | Updated: October 15, 2016 05:37 IST