पिंपरी : दीड वर्षाची चिमुकली घरात खेळत होती. आई स्वच्छतागृहामध्ये गेली होती. खेळता-खेळता मुलगी स्वच्छतागृहाजवळ आली आणि तिने स्वच्छतागृहाची बाहेरून कडी लावली. त्यामुळे आई आणि मुलगी दोघीही घरात अडकल्या. अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. जवानांनी घराच्या दरवाजाला छिद्र पाडले. घराची कडी उघडून आतमध्ये प्रवेश केला आणि माय-लेकरांची सुखरुप सुटका केली. ही घटना आत्मनगर सोसायटीत घडली.सानवी अनिल खाळकर (वय १) या मुलीची आणि तिच्या आईची अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. खाळकर कुटुंबीय आत्मनगर येथील सोसायटीत वास्तव्यास आहेत. गुरुवारी सानवी आणि तिची आई दोघीच घरात होत्या. सायंकाळी पावणे सातच्या सुमारास सानवीची आई स्वच्छतागृहामध्ये गेली होती. सानवीने खेळता-खेळता स्वच्छतागृहाला बाहेरून कडी लावली. त्यामुळे दोघीही घरात अडकल्या होत्या. (प्रतिनिधी)
घरात अडकलेल्या चिमुकलीची सुटका
By admin | Updated: February 17, 2017 05:02 IST