पुणे : ‘गाडी ढळली, गाडीत जागा होते अडवून बसले, काही लांडगे नि काही मेंढरे, ओलांडत गेली गाडी कैक स्टेशने, नद्या, पहाड, जंगले, शिवारे, उजाड झालेली गावे नि वसलेली शहरे ही कविता वाचल्यानंतर मनात प्रश्न येईल ही नक्की आहे कुणाची? पंजाबच्या अस्वस्थ वर्तमानावर भाष्य करणाऱ्या कवी आणि विश्व पंजाबी साहित्य संंमेलनाचे अध्यक्ष सुरजितसिंग पातर यांची! पातर यांच्या कवितांचे मराठीमध्ये प्रतिबिंब उमटले आहे. डॉ. अनुपमा उजगरे यांनी अनुवादाच्या माध्यमातून केलेले उत्तम संकलन पुस्तकरूपात मराठी साहित्याचा कायमस्वरूपी ठेवा बनणार आहे. पुण्यात होत असलेल्या विश्व पंजाबी साहित्य संमेलनादरम्यान या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार आहे. पंजाब जसा खाद्यसंस्कृतीमुळे परिचित आहे, तसाच तो सामाजिक अस्वस्थतेचेही प्रतिनिधित्व करीत आहे. या अंधारातील भीषण वास्तवाला अनेक पंजाबी साहित्यिकांनी लेखणीतून वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे, त्यातील एक नाव म्हणजे सुरजितसिंग पातर. पंजाबच्या दुखऱ्या आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या भूतकाळाच्या कड्या पातर यांच्या एकेक कवितेत बांधल्या गेल्या आहेत. त्यांची कविता आपल्या भवतालचे चित्रण करीत असतानाच अंतर्मुख होत आत्मनिष्ठेची आणि सामाजिकतेची बेमालूम सांगड घालीत आपल्या पृथक शैलीत अभिव्यक्त होताना दिसते.डॉ. अनुपमा उजगरे यांच्या ‘सुरजित पातर यांची कविता’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी संमेलनधाध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके आणि प्रभा गणोरकर यांच्या उपस्थितीत विश्व पंजाबी साहित्य संमेलनच्या उद्घाटन सोहळ्याच्या एक दिवस आधी होणार आहे.
पंजाबातील अस्वस्थतेचे मराठीत प्रतिबिंब
By admin | Updated: November 14, 2016 06:48 IST