राजगुरुनगर : रविवार सुटीचा दिवस आणि लग्नतिथीमुळे आज दिवसभर पुणे-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली. दुपारी तीन वाजल्यानंतर तर शिरोलीपासून ते पानमळ्यापर्यंत दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे वाहतूककोंडीत अधिकच भर पडत होती. संतप्त झालेले वाहनचालक व प्रवासी बाह्यवळण मार्ग कधी करणार, असा सवाल करीत होते. लग्नसराई सुरू झाली, की जास्त लग्नतिथीच्या दिवशी नेहमीच वाहतूककोंडीचा अनुभव प्रवाशांना अनुभवायला मिळत आहे. राजगुरुनगर येथे कमीत कमी दोन तास तरी अडकून पडावे लागते. त्यामध्ये चांडोली टोलनाक्याच्या परिसरामध्ये सात-आठ मंगल कार्यालये अगदी जवळ आहेत. त्यामुळे तेथेही वाहतूककोंडी होते. या वाहतूककोंडीचा फटका पुणे, मुंबई, नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात बसतो. अनेक राजकीय नेत्यांनाही या वाहतूककोंडीचा फटका बसला आहे. त्यामुळे कधी कधी ‘रडत घरी बसावे पण हसत बाहेर जाऊ नये,’ असा उद्वेग प्रवाशांना येत आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करण्याचा प्रवाशांनी धसकाच घेतला आहे. मुंबई-पुण्याहून निघतानाच राजगुरुनगर येथे वाहतूककोंडीत किती वेळ जाईल, याचा विचार वाहनचालकांना करावा लागतो. त्यातही अनेक मोटारसायकलस्वार चांडोली ते राजगुरुनगरदरम्यान केदारेश्वर बंधाऱ्यावरून ‘शॉर्टकट’ घेण्याचा प्रयत्न करतात. (वार्ताहर)
राजगुरुनगरला वाहतूककोंडी
By admin | Updated: February 6, 2017 06:01 IST