राजगुरुनगर : राजगुरुनगरच्या चांडोली येथील आर्याज स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या विद्यार्थी बसला झालेल्या भीषण अपघातात चौथीतील दोन मुले गंभीर जखमी झाली असून, अत्यवस्थ आहेत. या बसने बाजूचे तारेचे कुंपण तोडल्यामुळे त्या कुंपणाचा लोखंडी रॉड चालकाशेजारी एकामागे एक बसलेल्या दोन्ही मुलांच्या छाती-पोटातून आरपार गेल्याने ती अत्यवस्थ झाली आहेत. शंभूराजे महेंद्र अरगडे आणि मिहिर संतोष घनवट (दोघेही रा. कडूस, ता. खेड) अशी गंभीर जखमी मुलांची नावे आहेत. त्यांना पिंपरी-चिंचवड येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. पोलिसांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, चांडोली येथे आर्याज स्कूल ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. शाळा सुटल्यानंतर कडूसला जाणाऱ्या मुलांची बस (एमएच ०१-एच ५७७०) शाळेजवळून निघून दोन-तीन मिनिटांत चांडोलीच्या आयटीआयमागच्या रस्त्याला येताना, बसचालकाला मोटारसायकलने हूल दिल्यामुळे बस बाजूच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलामुलींच्या निवासी शाळेच्या, तारेच्या कुंपणावर गेली. बसच्या धडकेने कुंपणाचा वरचा लोखंडी रॉड बसची काच फोडून आत घुसला. हा रॉड तसाच चालकाशेजारी बसलेल्या मुलाच्या छातीतून आरपार जाऊन त्याच्या मागच्या मुलाच्याही पोटातून आरपार गेला. त्यामुळे अपघाताची भीषणता वाढली. गाडी थांबली आणि मुले घाबरून उतरून मागे पळाली. बसमधल्या शिक्षिकेला अपघात बघून भोवळ आली. एक मुलगा बेशुद्ध पडला, तर दुसरा सावध होता; पण वेदनांनी विव्हळत होता. रॉडला अडकल्यामुळे त्यांना हलविता येईना. शेवटी चांडोली फाट्यावरून गॅसकटर आणून तो रॉड तीन ठिकाणी कापून मुलांना बाजूला केले. मुलांच्या पोटात असलेल्या रॉडसह त्यांना रुग्णवाहिकेतून चाकणच्या खासगी रुग्णालयात हलविले व त्यानंतर तेथून चिंचवडच्या रुग्णालयात हलविले. दोघांचीही स्थिती चिंताजनक आहे. पोलिसांनी बसचालक सचिन बबन बैलभरे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)
राजगुरुनगरला स्कूल बसला अपघात
By admin | Updated: July 5, 2016 03:04 IST