राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात २ महिन्यांपासून सरकारी वकील म्हणून देवेंद्र मधुकर सोन्निस हे काम पाहत आहेत. आज दि. १४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पुणे लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी त्यांना लाच स्वीकारताना अटक केली. यातील तक्रारदार हे वकील असून त्यांच्या अशिलाचा जामीन अर्ज न्यायालयात सुनावणीसाठी आहे. सुनावणी होत असताना न्यायालयात हरकत घेऊ नये व जामीन मिळण्यासाठी मदत करण्यासाठी लोकसेवक देवेंद्र सोन्निस यांनी तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची मागणी केली होती.
पाच हजारांची लाच घेण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने पुणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज राजगुरुनगर येथे लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून तडजोडीअंती तक्रारदार यांच्याकडून साडेतीन हजार रुपये लाच स्वीकारताना एसीबीच्या पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. या यासंदर्भात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक विजयमाला पवार करीत आहेत.