केडगाव : दौंड तालुक्याचा पूर्व भाग, इंदापूरचा पश्चिम भाग तसेच पुरंदरच्या राजेवाडी परिसरात सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अवकाळी पावसाने झोडपून काढले. कालठनला गारांचा तर इतर ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. यामुळे परिसरातील वीजपुरवठाही खंडीत झाला होता. राज्यात रविवारी अवकाळी पावसाची पुन्हा शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली होती. १0 दिवसापूर्वी जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले होते. कांदा, द्राक्ष , गहू उत्पादकांना मोठा फटका बसला होता. काही दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा सोमवारी रात्री पावसाने सुरूवात केली आहे. दौंड परिसरात जोरदार पाऊस झाला.केडगाव, चौफुला, यवत, पारगाव, खुटबाव, राहू बेट परिसरात हा जोरदार वादळी पाऊस झाला. इंदापूरच्या लोणीदेवकर, कळाशी, कालठण, न्हावी, रूई, या भागात हलका पाऊस झाला. तर पुरंदर तालुक्याच्या राजेवाडी परिसरात सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला. (वार्ताहर)
दौंड, इंदापूरला अवकाळी पाऊस
By admin | Updated: March 10, 2015 04:50 IST