पुणे : रॅगिंगाचा अत्याचार सहन करणारा गेल्या सहा महिन्यांपासून मानसिकदृष्ट्या खचल्याने घरी बसून आहे आणि रॅगिंग करणारे मात्र केवळ एक लेखी हमीपत्र देऊन महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. याला कारण म्हणजे महाविद्यालय, विद्यापीठ आणि पोलीस या सर्व स्तरांवर कागदी घोडे नाचविले जात असून ‘प्रकरण न्यायप्रविष्ठ’ असल्याचे म्हणत त्याच्याविरुद्ध बोलण्यासही कोणी तयार नाही. एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन जणांनी आपल्याच एका सहाध्यायावर अमानुषपणे रॅगिंग केले.अनेक दिवस त्याला रुग्णालयातही राहावे लागले. या विद्यार्थ्यांच्या भीतीने तो महाविद्यालयातही जाऊ शकत नाही. कारण हा प्रकार उघडकीस येऊनही महाविद्यालयाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. महाविद्यालयाने पोलिसांकडे तक्रार देऊन आपले काम केले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे महाविद्यालय सांगत आहे. त्यामुळे रॅगिंग करणाऱ्यांवर दुसरी कारवाई करणे अवघड असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार द्यावी, अशीच सूचना करण्यात आली होती. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांकडून केवळ हमीपत्र घेतले. महाविद्यालयाच्या वेळेव्यतिरिक्त या विद्यार्थ्यांना महाविद्यालय परिसरात थांबू दिले जाणार नाही, असे म्हटले आहे. रॅगिंग किंवा तत्सम प्रकार पुन्हा केला तर संबंधितास काढून टाकण्याची कारवाई करावी, असे हमीपत्र या विद्यार्थ्यांकडून लिहून घेण्यात आले आहे. रॅगींगच्या या प्रकाराला बळी पडलेल्या विद्यार्थ्याची अवस्था मात्र अद्यापही सुधारलेली नाही. या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. रॅगिंग झालेल्या या विद्यार्थ्याची आई म्हणाली, ‘‘आरोपींना घाबरून मुलगा गेले सहा महिने कॉलेजला गेला नाही. आम्हाला न्याय हवा आहे.’’
रॅगिंगची शिक्षा केवळ लेखी हमीपत्रावरच
By admin | Updated: December 16, 2014 04:14 IST