पुणे : बिबवेवाडी पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराने वाढदिवसानिमित्त टोळक्यासह राडा घातल्याची सुपर इंदिरानगर येथील दुर्गामाता गार्डनजवळ गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. या सराईताला पोलिसांनी अटक केली आहे. भारत राजेश बडगुजर (वय २८, रा. दुर्गामाता गार्डनजवळ, सुपर इंदिरानगर) याला अटक करण्यात आली आहे. त्याचे बसवेश्वर ख्याले, नण्या पायगुडे, हैदर शेख, राक्या आदवडे, काळ्या स्वप्निल याच्यासह अन्य साथीदार पसार झाले आहेत. याप्रकरणी सहायक निरीक्षक जयवंत जाधव यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बडगुजरवर बारा गुन्हे दाखल आहेत. त्याचा गुरुवारी वाढदिवस होता. त्याचे साथीदार आणि मित्र मध्यरात्री एकच्या सुमारास त्याच्या घरासमोर जमले होते. त्या वेळी त्याच भागात राहणारे नागरिक नब्बी रसूल ऊर्फ गुलाब मुस्तफा बलुरंगी यांनी हातामध्ये हात घेऊन त्याला शुभेच्छा दिल्या. हातात हात घेतल्यामुळे चिडलेल्या आरोपींनी त्यांना घरात घुसून मारहाण केली. तसेच आई व पत्नीलाही शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारले. त्यानंतर आरोपींनी दगडफेक करून त्यांना जखमी केले. त्या वेळी सहायक निरीक्षक जाधव व अन्य पोलीस भांडणे सोडविण्यासाठी गेले असता त्यांच्याही अंगावर धावून जात दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)
सराईताच्या टोळक्याचा बिबवेवाडीमध्ये राडा
By admin | Updated: January 28, 2017 01:23 IST