पुणे : राज्य सरकारने राज्य परिवहन महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दिलेले १ हजार कोटी रुपये संपले आहेत. त्यामुळे मे महिन्याचे वेतन मिळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान राज्य परिवहन महामंडळाने राज्य सरकारला २ हजार कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी केली असून त्याबाबत अजून कोणताही निर्णय झाला नाही.
राज्यभरात एसटीचे जवळपास १ लाख कर्मचारी आहे. मूळ वेतन व अन्य भत्ते मिळून महिन्याला कर्मचाऱ्यांच्या वेतनावर जवळपास २७० कोटी रुपयांचा खर्च होतो. एप्रिल महिन्याच्या कर्मचारी वेतनासाठी राज्य सरकारकडून २३० कोटी रुपये मिळाले. त्यानंतर आता एसटीच्या गंगाजळीत वेतनासाठी काहीच शिल्लक नाही. अशा परिस्थितीत जर राज्य सरकारकडून कोणती आर्थिक मदत नाही मिळाली, तर कर्मचाऱ्यांचे मे महिन्याचे वेतन थकू शकते.
कोट :
एसटीची आर्थिक स्थिती बिकट आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार एसटीने प्रवासी वाहतूक थांबविली आहे. तेव्हा राज्य सरकारने एसटीला आर्थिक मदत करणे गरजेचे आहे.
- संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना