पिंपरी : छत्रपती शिवरायांची बदनामी करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊ नये, अशी एकमुखी मागणी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध सामाजिक, राजकीय संघटनेच्या वतीने सरकारचा निषेधही नोंदविला. या वेळी पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे, नागरी हक्क सुरक्षा समितीचे मानव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, क्रांती रिक्षा सेनेचे श्रीधर काळे, महाराष्ट्र फेरीवाला महासंघाचे काशिनाथ नखाते, भारिप बहुजन महासंघाचे के. डी. वाघमारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाचे गौतम आरकडे, तसेच वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, समता अधिकार आंदोलन, बामसेफ बचाव कृती समिती, रयत विद्यार्थी विचार मंच, क्रांतिवीर बिरसा मुंडा आदिवासी सामाजिक संघटना, नागरी सुरक्षा समिती, रिक्षा पंचायत, सातारा जिल्हा मित्र मंडळ, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, सम्यक विद्यार्थी आंदोलन या विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.या वेळी मारुती भापकर म्हणाले, ‘‘बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवरायांना बदनाम करणाऱ्या जेम्स लेन या विदेशी लेखकाला सहकार्य करून समस्त शिवप्रेमींचा अपमान केला आहे. त्यांच्या लेखनातही छत्रपती शिवाजीमहाराजांचा खरा इतिहास दडविला आहे. त्यामुळे समाजाला कधीही खरे शिवाजीमहाराज कळाले नाही.’’मानव कांबळे म्हणाले, ‘‘ पुरंदरे यांनी शिवाजीमहाराजांचा इतिहास बदलला. बहुजनांच्या राजाला त्यांनी उच्चवर्णियांचे हितचिंतक म्हणून समाजासमोर उभे केले. जे स्वत:ला शिवप्रेमी म्हणवतात, त्याने रस्त्यावर उतरून पुरंदरेंना देण्यात येणाऱ्या पुरस्काराला विरोध करायला हवा.’’ अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र सरकारचा निषेध करून पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात येऊ नये, अशी मागणी केली. (प्रतिनिधी)
पुरंदरे यांना पुरस्कार नको
By admin | Updated: August 18, 2015 23:49 IST